खोक्याभाईचे काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळे तेच भरलेत:राज ठाकरेंचा सरकारला टोला, भाजप नेते आशिष शेलारांनीही दिले खोचक प्रत्युत्तर

एका खोक्या भाईचे काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला. ते आज मुंबई पक्षाच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरे यांच्या या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार यांनीही खोचक उत्तर दिले आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, लोक निवडून देत नाहीत. ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज रवींद्र नाट्य मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सरकारवर उपरोक्त टीका केली. नेमके काय म्हणाले राज ठाकरे? एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला आहात, विधानसभेत सगळे खोक्या भाईच भरलेले आहेत, त्यामुळे मूळ विषय बाजूला राहतात, तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जाते, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही राज ठाकरे म्हणाले. आशिष शेलार काय म्हणाले? भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. एखादे वाक्य आपले अस्तित्व जाणून देण्यासाठी करणे, आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेण्यासाठी बोलणे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत जे लोक काम करत आहेत, ते निवडून आले आहेत. त्या लोकांना जनतेनं निवडून दिलेले आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मनसेमध्ये नव्या पदरचना दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेत अनेक बदल केले असून नवीन पदरचना तयार केल्या आहेत. मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली असून संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगरपदी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगरपदी योगेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.