चाकू समीक्षाच्या थेट बरगड्यांमध्ये घुसला:हॉलमध्ये पडला रक्ताचा सडा, कोल्हापुरातील हत्याकांडाने खळबळ

कोल्हापूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र राहत होते. मात्र अलीकडे झालेल्या वादामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेली होती. दरम्यान, सतीशने तिच्यावर सतत लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समीक्षाने लग्नाला स्पष्ट नकार दिला. हा नकार सतीशला सहन न झाल्याने, जेव्हा समीक्षा पुन्हा घरी आली तेव्हा त्याने तिचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर सतीश यादव कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळ गावी गेला आणि तिथे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समीक्षा मैत्रिणीसोबत भाड्याच्या घरात राहत होती कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा भयानक खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समीक्षा नरसिंगे ही सतीश यादवसोबत नातं तोडल्यावर मैत्रिणीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. त्या दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होत्या. मात्र, सतत चालणाऱ्या वादांमुळे घरमालकाने घर रिकामं करण्यास सांगितल्याने समीक्षा सध्या आईच्या घरी राहत होती. सतीश यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. तो शिवाजी पेठेत क्लब चालवायचा. समीक्षाने त्याला अनेकदा दुसरे काहीतरी काम कर, असे सांगितले होते. चाकू थेट बरगड्यांपर्यंत घुसला मंगळवारी समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत सामान आणण्यासाठी सरनोबतवाडीतील घरात गेली असता, तिने सतीशला फोन केला. अवघ्या 15 मिनिटांत सतीश त्या ठिकाणी पोहोचला आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून जोरदार वाद झाला. मैत्रिणीने शांतता राखण्याचा प्रयत्न केला, पण संतापलेल्या सतीशने अचानक त्याच्याकडील चाकूने समीक्षाच्या छातीत जोरदार वार केला. चाकू इतक्या ताकदीने खुपसला गेला की तो थेट बरगड्यांपर्यंत घुसला. समीक्षा जागेवर कोसळल्यानंतर सतीशने तिला लाथा घालून घरातून निघून गेला. समीक्षाच्या मैत्रिणीने तत्काळ आपल्या मित्रांना बोलावून समीक्षाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घरात पडला रक्ताचा सडा समीक्षा आणि तिची मैत्रीण ज्या घरात राहत होते, ते एका पोलिस कर्मचाऱ्याचे होते. सतीश आणि समीक्षा यांच्यात भांडण झाल्यानंतर मैत्रिणीने वाद सोडवायचा प्रयत्न केला. तिने सतीशला चाकू मारण्यापासून अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिला यश आले नाही. सतीशने चाकू जोरात समीक्षाच्या छातीत घुसवला. हा चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्ये अडकल्याने बाहेर निघत नव्हता. घरात हॉलपासून ते किचनपर्यंत समीक्षाच्या रक्ताचा सडा पडला होता. सतीशचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेनंतर सतीश यादवने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळगावी जाऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या दुहेरी घटनांमुळे कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, समीक्षा नरसिंगेच्या वडिलांचे 7 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. चार वर्षांपूर्वीच समीक्षाचे लग्न देखील झाले होते. परंतु ती नवऱ्यासोबत राहत नव्हती. समीक्षा आणि तिच्या नवऱ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने समीक्षाने सतीशसोबत लग्नास नकार दिला होता. समीक्षाची आई मासे विक्रीचा व्यवसाय करते, तर समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत कुटुंबाला हातभार लावत होती. समीक्षाच्या मृत्यूने आई व भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.