कोल्हापुरात गोड्या पाण्यात मोती पिकतोय सोन्यावाणी:शिवाजी विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी करत आहेत शेती

मौल्यवान मोती जर शेतात पिकू लागला तर? असे नुसते म्हटले तरी सर्वसामान्यांचा विश्वास बसणार नाही. पण समुद्राच्या तळाशी मिळणारा मौल्यवान मोती निर्माण करणे आता शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली गावातील दीपक कांबळे यांनी गोड्या पाण्यातील मोत्याच्या शेतीचा प्रयोग केला आणि त्याला यश मिळाले आहे. आता हीच गोड्या पाण्यातील शेती शिवाजी विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी करत आहेत. संशोधन यशस्वी झाले असून या वर्षी पुन्हा पाचशे शिंपले गोड्या पाण्यात संवर्धनासाठी सोडण्यात आले आहेत.
कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाने मोती पिकवण्याची शेती केली आहे. येथील प्राणिशास्त्र विभागाने गतवर्षी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी गोड्या पाण्यातील मोत्याच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला हाेता. मोती पिकवण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यशही आले. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते नुकताच भेट देण्यात आला, तर कुलगुरूंच्या उपस्थितीत या वर्षीसाठी ५०० शिंपले गोड्या पाण्यात सोडण्यात आले आहेत.
१०० शिंपल्यात मृत्युदर २० %
मोती संशोधन केंद्राचे समन्वयक तथा प्राणिशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे म्हणाले, गतवर्षी आम्ही पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या १०० शिंपल्यांमधील मृत्युदर अवघा २० टक्के आढळला. शिंपल्याची क्षमता, वजन, आकार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यावर संशोधन सुरू करण्यात आले. यासाठी शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एमएस्सीच्या विद्यार्थ्यांनी तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बारा महिन्यांचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही आता या वर्षी जास्त संख्येने शिंपले संवर्धनासाठी पाण्यात सोडले आहेत. १२ महिन्यांनी पहिला माेती
प्राणिशास्त्र अधिविभागाच्या परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्र उभारण्यात आले असून गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन व विकासाचे काम सुरू केले. मोती या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगशील दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य देखभाल आणि संवर्धनामुळे शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती साकार होऊ लागले आहेत. त्यातील साधारण १२ महिन्यांनंतर पहिला मोती तयार झाला. विशेष म्हणजे या संशोधन केंद्रास महाराष्ट्र जैवविविधता मंडळाची परवानगी मिळाली आहे. कमी खर्चामध्ये मिळतो जास्त नफा