कोंढवा येथून अंमली पदार्थ जप्त:राजस्थानी तरुणाकडून 5 लाख 13 हजार रुपयांचा एक किलो अफू हस्तगत

अफूच्या बोंडांचा चुरा बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडांचा चुरा, अफू असे पाच लाख १३ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षकनगर, येवलेवाडी, कोंढवा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक येवलेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी काला याच्याकडे अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), अफू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून काला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. पिशवीत एक किलो ७२८ ग्रॅम अफूच्या बोंडांचा चुरा, तसेच ५८ मिलिग्रॅम अफू सापडली. काला याने अमली पदार्थ कोठून आणले, तसेच कोणाला विकणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एक) वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, स्वप्नील मिसाळ यांनी ही कारवाई केली. शासकीय इमारतीच्या आवारातून चंदनाची चोरी शासकीय इमारतीच्या आवारातून चोरट्यांनी १५ हजार रूपये किमतीच्या चंदनाची चोरी केली आहे. ही घटना पाषाणमधील शासकीय लेखन सामग्री भांडार पंचवटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक मंगेश शिखरे (वय ३६, रा. पर्वती दर्शन ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मंगेश शिखरे हे पाषाणमधील शासकीय लेखन साम्रगी भांडार पंचवटी परिसरात सुरक्षारक्षक आहेत. २६ मे रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भांडार परिसरात प्रवेश करून १२ हजार रूपये किंमतीची चंदनाचे झाड कापून नेले. दुसर्या दिवशी शिखरे यांना चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार वाघवले पुढील तपास करीत आहेत.