कुंभमेळ्यातून जनरल कोचने मोफत परतीचा प्रवास शक्य:तिकीट गर्दी रोखण्याच्या पर्यायावर विचार सुरू

केंद्र सरकार १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सुविधेच्या नव्या पर्यायावर विचार करत आहे. सूत्रानुसार रेल्वे कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांना सामान्य श्रेणीत (जनरल कोच) विनातिकीट अशी सवलत देऊ शकते. त्याच्या सर्व प्रक्रियेला अंतिम रूप दिले जात आहे. कुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत देशभरातून सुमारे ४५ कोटी लोक येण्याची शक्यता आहे. रेल्वे त्यासाठी ३ हजार विशेष गाड्या सेवेत आणेल. या गाड्यांच्या १३ हजारांवर फेऱ्या होतील. दररोज सुमारे ५ लाखांहून जास्त प्रवासी सामान्य श्रेणीतून प्रवास करतील. एवढ्या जास्त संख्येने असलेल्या भाविकांना एका दिवसात तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था ही मोठे आव्हान ठरू शकते असे रेल्वेला वाटते. म्हणूनच गर्दी व्यवस्थापन म्हणून हा पर्याय विचाराधीन आहे. ही सुविधा केव्हापासून, कशी मिळेल? कुंभमेळ्यातील सर्व भाविकांना सुविधा मिळेल? नाही. सुविधा सामान्य श्रेणीतून कुंभातून परतणाऱ्यांना मिळेल. बाकी कोचमध्ये आरक्षित तिकीट लागेल. प्रवासी कुंभातून देशात कुठेही जाऊ शकतील? नाही. तूर्त प्रयागराजहून २०० ते २५० किमीपर्यंतच्या प्रवाशांसाठी ही सुविधा देण्याचा विचार आहे. एखाद्याला २५० किमीहून दूर जायचे असल्यास ? लांब पल्ल्याचे प्रवासी गर्दीमुळे तिकीट खरेदी करू शकत नाहीत. ते रेल्वेत प्रवासादरम्यान टीटीईकडून तिकीट खरेदी करू शकतात. कुंभातून परतणाऱ्यांना दंड नसेल. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांसाठी शेकडो तिकीट काउंटर बनवावे लागतील. तेवढी पायाभूत व्यवस्था चालवणे खर्चिक व दुरापास्त. रेल्वेने पर्याय म्हणून स्थानकावर स्कॅनर तिकीट खरेदीचा प्रयोग केला, परंतु एकाच वेळी मोठ्या संख्येत तिकीट बुक केल्याने नेटवर्क जामची स्थिती उद्भवत आहे. रेल्वेचे एक अधिकारी म्हणाले, प्रचंड गर्दी असताना भाविकांनी रांगेतून तिकीट घेणे व्यवहार्य ठरत नाही. रेल्वेसाठी वेळ कमी असल्याने समस्या वाढू शकते. विनातिकीट प्रवासाबद्दल दंडाची तरतूद आहे. तपासणीसाठी मोठा स्टाफ हवा. म्हणूनच अनारक्षित श्रेणीची तिकिटे मोफत करण्याचा विचार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment