कुणाल कामरा हा काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग:त्याचा बोलवता धनी ‘मातोश्री’वर, त्याला धडा शिकवणार; संजय निरुपम यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिंदेंवर केलेल्या उपहासात्मक टिप्पणीवरून ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली आहे. कुणाल कामरा हा काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग आहे. त्याचा बोलवता धनी मातोश्रीवर बसला असून, आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी उपरोक्त आरोप केला आहे. कुणाल कामरा संजय राऊतांचा खास माणूस संजय निरुपम येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, विकृत कुणाल कामरा याने ठाकरे गटाची सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवमानजनक गाणे केले. कुणाल कामरा हा संजय राऊतचा खास मित्र आहे. त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीवर पैसे देण्यात आले. संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या सांगण्यावरुन कामराने विकृत गाणे केले. हा कामरा काँग्रेस पक्षाचा एक भाग असून त्याचे राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संबंध आहेत. कुणाल कामराने संविधानातील भाषा स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. स्टँडअप कॉमेडिअन म्हणून शिवीगाळ करणे, निंदा करणे ही कलाकृती नाही तर विकृती आहे. अशा विकृत माणसाला आता शिवसैनिक धडा शिकवतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदारांसह उठाव केला. या उठावाला लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी स्वीकारले आणि शिवसेनेला भरभरुन मतदान केले. कुणाल कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग संजय निरुपम म्हणाले, कुणाल कामरा याच्या विकृतीचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली. कामरा हा राऊतचा खास मित्र आहे. त्याला अशा प्रकारे उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी करण्यासाठी उबाठाकडून पैसे देण्यात आल्याचा संशय निरुपम यांनी यावेळी व्यक्त केला. कामरा हा डावी विचारसरणीचा कार्यकर्ता असून तो काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग बनला आहे. कामरा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी कामरा याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून पैसे घेऊन अशा प्रकारची राजकीय नेत्यांची बदनामी करण्याचे काम कामरा करतोय, असा आरोप निरुपम यांनी केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बदनामी करणारे गाणं ज्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले त्यासाठी मातोश्रीवरुन कामराला पैसे देण्यात आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावरुनच कामराने उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केली, असा गंभीर आरोप निरुपम यांनी केला.