कुणाल कामराला दहशतवादी संघटनांकडून पैसे:राहुल कनाल यांची पोलिसांत तक्रार; कॅनडा, USA, पाकिस्तान मधून फंडिंगचा आरोप

स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरुद्ध राहुल कनाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी कुणाल कामराला दहशतवादी संघटनांकडून पैसे मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही तर असे अनेक गंभीर आरोपही राहुल कनाल यांनी कुणाल कामरा याच्यावर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तयार केलेला गाण्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. त्यासाठी कुणाल कामरा याला पोलिसांना दोन वेळा समन्स देखील बजावले आहेत. मात्र, तरी देखील कुणाल कामरा याने माफी मागण्यास नकार देत आणखी काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढणार असे दिसून येत आहे. यातच आता कुणाल कामरा विरोधात राहुल कनाल यांनी खार पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी मध्ये कुणालला दहशतवादी संघटनांकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राहुल कनाल यांनी केलेला आरोपांनुसार दहशतवादी संघटना कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला पैसे देतात. त्यामुळे आता त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याविषयी माध्यमांशी बोलताना राहुल कनाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्व मोठ्या नेत्यांवर तो बोलतो. हम होंगे कामियाब असे देशाचे गाणे आहे. या गाण्याला हम होंगे कंगाल असे बनवण्यात आले आहे. हे आक्षेपार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर कॅनडा, युएसए आणि पाकिस्तान मधून 400 डॉलर कुणाल कामराला पाठवण्यात आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. कुणाल कामरा बद्दल बोलताना राहुल कनाल म्हणाले की, मेहनत करून पैसे कमावणे वेगळे आहे. परंतु त्यांना मिळणारे पैसे ही वेगळी कमाई आहे. ज्याला टीप म्हणतात. एक दिवसांपूर्वी चारशे डॉलर त्यांना देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने दहशतवादी संघटने कडून त्याला पैसे जात आहेत. यासाठी पत्राची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मुंबई पोलिसांना दिली असल्याची माहिती त्यांनी देखील दिली. त्यामुळे 24 तासात त्याच्या youtube चॅनलवर कारवाई झालीच पाहिजे. त्याचे यूट्यूब अकाउंट बंद केले पाहिजे, अशी मागणी देखील राहुल कनाल यांनी केली आहे.