कुणीही उठून मनाला वाटेल तसा महाराजांचा इतिहास सांगतो:युवराज संभाजीराजे संतापले; यावर ठोस उपाय देखील सुचवला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण कळावे म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असे काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिले गेले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. तसेच महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. यावरुन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे. इतकेच नाही तर यावर त्यांनी ठोस उपाय देखील सुचवले आहेत. या संदर्भात शासनाने शिव चरित्राचे संशोधक, अभ्यासक व चिकित्सक यांची संशोधन समिती स्थापन करून भक्कम संदर्भांवर आधारित शासकीय चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. त्यामुळे शासकीय चरित्रग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल आणि इतिहासाविषयी वादंग उठणार नाही, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून शासनाकडे ही मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. हल्ली कुणीही उठून आपापल्या आकलनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा सांगत आहे. इतिहासाची प्रतारणा होईल, लोकभावनेस ठेच लागेल, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, याचे कुणालाही भान राहिलेले नाही. यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा. शासनाने शिवचरित्राचे संशोधक, अभ्यासक व चिकित्सक यांची संशोधन समिती स्थापन करून भक्कम संदर्भांवर आधारित शासकीय चरित्रग्रंथ प्रकाशित करावा, जेणेकरून शिव चरित्रावरील व्याख्याने, मालिका, नाटक, चित्रपट आदी सर्व साहित्यांस हा शासकीय चरित्रग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल आणि इतिहासाविषयी वादंग उठणार नाही. याविषयी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी. मी या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. राहुल सोलापूरकरांचे ‘ते’ विधान काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण कळावे म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असे काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिले गेले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचे. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेले आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही, असाही दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. शिवरायांचा अवमान करण्याचे माझ्या मनातही येऊ शकत नाही – सोलापूरकर साम-दाम-दंड-भेद या चारही बाबतींत छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले, यावर मी वेगळे काही संगायची गरज नाही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिकाही मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. सगळा इतिहास अभ्यासून, जगभर गेली अनेक वर्षं वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्याने मी दिल्याचे राहुल सोलापूरकर म्हणाले. जगभरातल्या लोकांनी ते वाखाणलेले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असे हा बोलला, असे म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला, असे राहुल सोलापूरकर यांनी म्हटले होते.

  

Share