कुत्रा-मांजरी वरून जातीय तेढ निर्माण करायचे का?:मनोज जरांगे यांचा सवाल; संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी

राज्यात आता कुत्रा आणि मांजरी वरून जातीय तेढ निर्माण करायचे आहे का? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. संभाजी महाराज एकाकी पडले असे, माध्यम म्हणत असतील तर ते कधीही एकाकी पडणार नाही. अशा शब्दात त्यांनी संभाजी महाराजांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना देखील सहआरोपी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये मेळाव्यादरम्यान अचानक प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना बीडमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांनी विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्या वरून सुरू असलेल्या राज्यातील वादावर जास्त बोलण्यास नकार दिला. मी इतिहासकार नाही. त्यामुळे याविषयी इतिहासकार जास्त बोलतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याचा वाद काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा वाघ्या, त्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाभोवती आणि रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळच असलेल्या त्याच्या स्मारकामुळे उपस्थित केला जात आहे. शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. या पत्रात कुत्र्याच्या अस्तित्वाला समर्थन देणारे ऐतिहासिक पुरावे नाहीत असे म्हटले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याची पुष्टी केली आहे. ज्यामुळे पुतळा हटवण्याच्या युक्तिवादाला बळकटी मिळते. या वादामुळे इतिहासकार, राजकारणी आणि सामान्य जनतेमध्ये वाद निर्माण झाला आहे, काहींनी असा युक्तिवाद केला आहे की वाघ्याचा पुतळा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अनावश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे वाघ्याचा पुतळा यापूर्वी 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या सदस्यांनी काढून टाकला होता, परंतु नंतर तो पुन्हा बसवण्यात आला. स्थानिक धनगर समाजाने वाघ्या हा खरोखरच एक खरा कुत्रा होता असे मानून पुतळा हटवण्यास विरोध केला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. बीडमधील मराठा मेळाव्यात मनोज जरांगे यांना भाषणानंतर भोवळ:खासगी रुग्णालयात दाखल; डॉक्टर प्रकृतीवर नजर ठेवून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी अचानक बिघडली होती. बीडमधील मराठा प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मेळाव्यात भाषण करताना त्यांना अशक्तपणा जाणवला. त्यांनी व्यासपीठावर बसूनच 45 मिनिटे भाषण केले. भाषण संपल्यानंतर ते भावुक झाले. डोळ्यांत अश्रू आले. त्यानंतर त्यांना भोवळ आली. उपस्थितांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. नंतर जरांगे पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. पूर्ण बातमी वाचा….