लाडकी बहीण योजनेवर पुन्हा टाच:शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी केवळ 500 रुपये मिळणार

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टाच झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते, त्याच महिलांची नावे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये देखील आहेत. अशा आठ लाख महिलांना आता दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये महिना मिळणार आहे. या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आता या महिलांचे पैसे कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील नियमानुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र सरकारकडून देखील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12000 रुपये मिळत आहे. त्यामुळे आता या महिलांना वर्षाला केवळ सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत. केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. त्यानंतर आता त्याच धर्तीवर 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्र नमो महा सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत केली जाते. म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तर केंद्र सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये या महिलांना मिळतात. त्यामुळे अशा महिलांना आजा लाकडी बहिण योजनेचे केवळ वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत.