भाषावाद:उत्तर भारतातील 25 भाषा हिंदी, संस्कृतमुळे नष्ट झाल्या- स्टॅलिन, हिंदी लादल्यास विरोध करणार

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी पुन्हा केंद्राकडून हिंदी लादल्याच्या आरोप करत आवाज उठवला. ते म्हणाले, ‘राज्यांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आम्ही सफल होऊ देणार नाही. तामिळ आणि तिथल्या संस्कृतीचे आम्ही रक्षण करू.’ स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘हिंदी हा मुखवटा तर संस्कृत हा छुपा चेहरा आहे.’ त्यांनी दावा केला की, हिंदी-संस्कृतच्या वर्चस्वामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील मैथिली, ब्रजभाषा, बुंदेलखंडी, अवधी अशा २५ हून अधिक उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्या. केंद्र नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे (एनईपी) हिंदी व संस्कृत लादण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याला तामिळनाडूमध्ये विरोध होत आहे. स्टॅलिन म्हणाले, त्रिभाषा धोरणानुसार अनेक राज्यांमध्ये संस्कृतचाच प्रचार हाेत आहे.तामिळनाडूत पुढील वर्षी निवडणुका; विरोध राजकीय?पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी सीएम स्टॅलिन या ६ दशके जुन्या वादाला खतपाणी घालत आहेत. १९६३ मध्ये, हिंदीला राजभाषा करण्याचा प्रस्ताव होता, जो २६ जानेवारी १९६५ पासून लागू होणार होता. तामिळनाडूत निदर्शने झाली. द्रमुकच्या नेतृत्वाखाली हिंसक निदर्शने झाली. या आंदोलनात सुमारे ७० जणांना जीव गमवावा लागला होता. केंद्राला माघार घ्यावी लागली. १९६७ मध्ये भाषा धोरणात सुधारणा करण्यात आली, ज्यामध्ये इंग्रजीदेखील अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट झाली. 3 भाषांचे धोरण काय आहे, ज्याला विराेध नवीन शैक्षणिक धोरणातील ३ भाषांचे सूत्र असे समजून घ्या… मुलांना किमान ३ भाषांचे ज्ञान असावे हा त्याचा उद्देश आहे. पहिली भाषा ही सामान्यतः विद्यार्थ्याची मातृभाषा किंवा राज्याची प्रादेशिक भाषा असेल. उदाहरणार्थ, तामिळनाडूत तामिळ, महाराष्ट्रात मराठी. दुसरी भाषा ही इतर भाषा असू शकते, परंतु राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी केंद्र हिंदीला प्रोत्साहन देते, विशेषत: बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये. तथापि, ते अनिवार्य नाही आणि राज्ये त्यांच्या सोयीनुसार दुसरी भाषा निवडू शकतात. तामिळनाडूचा यालाच विरोध आहे. तिसरी भाषा इंग्रजी किंवा परदेशी भाषा (उदा. फ्रेंच, जर्मन) असू शकते. त्यातून मुले जागतिक व्यासपीठावर उपस्थिती दर्शवू शकतील. गैर-हिंदी भाषिक राज्यांमध्ये ती हिंदीही असू शकते, तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इतर भारतीय भाषा निवडू शकतात (जसे तामिळ, तेलगू).