लासलगावला दोन तास कावड मिरवणूक, महापूजा व अभिषेक:सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी

‘बोल बजरंग बली की जय, सियावर रामचंद्र की जय, असा जयघोष करत लासलगाव शहरात भाविकांच्या वतीने पालखी आणि कावड मिरवणूक काढण्यात आली. शहरातील श्रीराम मंदिरात पहाटे सहा वाजता भाविकांच्या उपस्थितीत जयंती सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या श्री हनुमान मंदिरात भाविकांची जन्मोत्सव व दर्शनासाठी गर्दी होती. पहाटेच्या भाविक व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. हनुमान चालिसा पठण आणि आरतीही यावेळी घेण्यात आली. फुलांची उधळण करत जन्मोत्सवात भाविक दंग झाल्याचे चित्र होते. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील श्रीराम मंदिर परिसर, अहिल्यादेवी चौक, पाटील गल्ली, शिंपी गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ या मार्गावरून कावड मिरवणूक काढण्यात आली. किल्ला परिसरात महिलांनी कावडधारकांचे व श्री हनुमान पालखीचे औक्षण करून विधीवत पूजन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले. होळी ते श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात हनुमान चालिसा पठण कार्यक्रम विविध मंदिरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सायंकाळी श्रीराम मंदिर येथे या कार्यक्रमाचा समारोप झाला. डोक्यावर भगवी टोपी परिधान करत पुरुष भाविक सहभागी झालेले होते. संगीतमय हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला.