विधानसभा अध्यक्ष मुंबईतील रस्त्यांवर नाराज:म्हणाले – मुंबईत आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल अशी स्थिती

विधानसभा अध्यक्ष मुंबईतील रस्त्यांवर नाराज:म्हणाले – मुंबईत आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल अशी स्थिती

मुंबईतील रस्त्यांच्या मुद्यावर शुक्रवारी विधानसभेत चर्चा झाली. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाचे उदाहरण देत मुख्यंमत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल अशी आजची स्थिती असल्याचे परखड मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानाची विधिमंडळ परिसरात खमंग चर्चा सुरू होती. विधानसभेत आज सत्ताधारी व विरोधी पक्षांतील आमदारांनी मुंबईतील रस्त्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामावरून प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पण या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम झाले. काम रेंगाळले. यंत्रणा काहीच काम करत नव्हती, असे भातकळकर म्हणाले. नार्वेकरांनी आळवला नाराजीचा सूर त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले. सामंत यांच्या या उत्तरानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाराजीचा सूरात आपली भूमिका मांडली. मला या विषयात बोलायचे नव्हते, पण मला बोलावे लागेल, असे ते म्हणाले. माझ्या मतदारसंघात दोन-अडीच वर्षांपूर्वी पहिले टेंडर निघाले. पण कंत्राटदाराने कोणतेही काम केले नाही. त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी पुन्हा टेंडर काढले. पण अजूनही काम सुरू झाले नाही. सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून काढले. त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दंड आकारण्यात आला. पण महापालिकेने दंड वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी बाब नार्वेकरांनी निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते. पंरतु, प्रशासनाकडून ज्या प्रकारची कारवाई होत आहे, ती पाहता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. अखेर अध्यक्षांनी लावली बैठक राहुल नार्वेकर यांच्या या विधानानंतर भाजप आमदार अमित साटम यांनीही मुंबईतील रस्त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. या कामामु्ळे आमच्या नाकीनऊ आलेत. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. मुंबईकरांची क्वालिटी ऑफ लाईफ काय? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यानंतर अमित देशमुख, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनीही रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. अखेरीस अध्यक्षांनी सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदारांची बैठक घेण्याचे जाहीर केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment