‘तुला मुलगा होत नसेल तर आमच्याकडे ये’:मयुरी हगवणेच्या आईच्या पत्रात गंभीर आरोप; रूपाली चाकणकर यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी पुणे पोलिस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. यासंबंधी वैष्णवी हगवणे यांची मोठी जाऊ मयुरी हगवणे यांच्या पत्रावर राज्य महिला आयोगाने 24 तासात कारवाई करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. असा दावा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये रूपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाने तात्काळ त्सुमोटो याचिका दाखल करुन घेतली असल्याचा दावा केला आहे. तसेच मयुरी हगवणे यांच्या आई आणि भावाने दिलेल्या सहा नोव्हेंबरच्या पत्रावर सात नोव्हेंबरलाच महिला आयोगाने बावधन पोलिस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाईचे निर्देश दिले असल्याचा दावा देखील केला आहे. मात्र या प्रकरणात त्याच दिवशी मयुरी हगवणे यांची नणंद करिष्मा हगवणे यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यामुळे क्रॉस कम्प्लेंट दाखल झाल्याने दोन्ही प्रकरणाचा तपास बावधन पोलिस ठाण्याकडे पाठवण्यात आला असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. पत्राची गंभीर दखल आयोगाने का घेतली नाही? मात्र, या सर्व प्रकरणात रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय. कालही काही सामाजिक संघटनांनी चाकणकर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. आता मयुरी यांच्या आईने लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल आयोगाने का घेतली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गाड्यांची व रोख रकमेची मागणी या प्रकरणात मयुरी हगवणे यांची आई लता राजेंद्र जगताप आई आणि भाऊ मेघराज राजेंद्र जगताप यांनी हे पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी म्हटले की, माझी मुलगी सौ. मयुरी सुशील हगवणे हीचे 20 मे 2022 रोजी श्री. सुशील राजेंद्र हगवणे रा. भुकुम ता. मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फार्च्युनर पाहीजे, पैसे पाहीजे अश्या गाड्यांची व रोख रकमेची मागणी करूण त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद पत्रात नमूद करण्यात आल्या नुसार 6 नोव्हेंबर 2024 पती घरी नसताना सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिचे कपडे फाडले, मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला. तर दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर ‘तुला मुलगा होत नसेल तर आमच्याकडे ये’ या भाषेत शिवीगाळ केली असल्याचा आरोप देखील त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. या दरम्यान मुलीने मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू केले, हे कळतात दीर शशांक राजेंद्र हगवणे याने मोबाईल हिसकावून तिथून पळ काढला. विशेष म्हणजे त्याचा पाठलाग करत असतानाची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असल्याचा दावा देखील त्यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.