महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था:183 लोकांना श्रीनगरहून मुंबईत आणण्यात येणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक अडकले असून त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या खर्चातून ही व्यवस्था मोहोळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहोळ यांच्यात पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मोहोळ यांनी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विमानांमधून १८३ महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगर मुंबई येथे आणण्यात येणार आहे गुरुवारी दोन विशेष विमाने आल्यानंतर आणखी काही पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून जितके महाराष्ट्रातील नागरिक असतील, त्या सर्वांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या पर्यटकांना मोफत आणले जात असून याचा खर्च राज्य सरकार करत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून माझ्या कार्यालयासह वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून संपर्क होत असून महाराष्ट्रातील पर्यटक घडलेल्या घटनेमुळे भीतीच्या वातावरणात होते. मात्र सर्वांशी संवाद साधल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असून प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. गुरुवारी दोन विशेष विमाने पोहोचल्यानंतर उरलेल्या पर्यटकांना देखील आणण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील शेवटचा नागरिक महाराष्ट्रात येईपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.