महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर सुवर्णक्षण:रोहित पवार यांची प्रतिक्रिया; माझ्यासाठी आनंदाची बातमी – सुप्रिया सुळे

मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे, यात कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे, असे विधान उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी देखील मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असे वक्तव्य केले आहे. रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संभाव्य युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी ट्विट केले की, मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवे आणि यातच महाराष्ट्राचे हीत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे – सुप्रिया सुळे यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज ठाकरे असं म्हणाले आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे. माझ्या अंगावर काटा आला. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे गेल्या पाच- सहा दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आजही आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहेत. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबीक इतिहासातला हा सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे.