महाराष्ट्रात राज-उद्धव युतीची चर्चा:तिकडे ठाकरे बंधू परदेशात, पुढचा निर्णय नेमका काय होणार?

महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युती करणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांना मुलाखत देताना राज ठाकरे यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रासमोर आमची भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्रासाठी आम्हाला एकत्र येण्यात काहीच अडचण नाही. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात आम्ही पण भांडणे बाजूला ठेवायला तयार आहोत, असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज-उद्धव युती होणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राज-उद्धव युती होणार का आणि झालीच तर त्याचे महाराष्ट्रात काय परिणाम होतील यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच राज ठाकरे हे परदेश दौऱ्यावर आहेत तर उद्धव ठाकरे देखील परदेशात गेले आहेत. त्यामुळे दोघांत नेमके काय सुरू आहे अशा देखील आता चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अनेक नेत्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला देखील दोघांनी एकत्र यावे असे वाटत आहे. दरम्यान, राज ठाकरे हे 29 एप्रिलला महाराष्ट्रात परतणार आहेत, तोपर्यंत कोणीही युतीविषयी बोलू नये अशा सूचना मनसे नेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 29 एप्रिलनंतर राज ठाकरे स्वतः याविषयी बोलणार का? असाही प्रश्न पडला आहे. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील एका मुलाखतीत राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातील भांडणे किरकोळ आणि क्षुल्लक आहेत. एकत्र येणे हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे, असे राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात याची उत्सुकता सर्वांच्या मनात होती. उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात बोलताना राज ठाकरे यांच्या विधानाला प्रतिसाद देताना म्हणाले, आपल्याकडून भांडण नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणे दूर ठेवायलाही तयार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, याच सोबत त्यांनी एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचे आहे की आपल्यासोबत ते ठरवा, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंक्तीला बसणार नाही, याचा निर्णय घ्या, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली होती.