महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची 80% शक्यता:हवामान विभागाचा पहिला अंदाज, देशात 105% पाऊस

महाराष्ट्रासह देशभरात यंदा सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा पहिला अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरी १०५% पावसाची शक्यता असल्याचा त्यांचा अंदाज आहे. सरासरीच्या ९६ ते १०४% पाऊस पडला तर हवामान खाते त्याला सामान्य पाऊस मानते. देशभरात चार महिन्यांत सरासरी ८७ सेंमी (१००%) पाऊस झाला तर हवामान खाते त्याला सामान्य मानते. यंदा सरासरी ९१.४ सेंमी पावसाची शक्यता आहे. हवामान खाते पावसाळ्यापूर्वी दोन वेळा अंदाज जाहीर करते. आता एप्रिलमध्ये जाहीर झालेला अंदाज प्राथमिक संकेत असतो. तर मेच्या मध्यापासून ते मान्सून आगमनापर्यंतचा दुसरा अंदाज जास्त अचूक मानला जातो. मराठवाड्यातही चांगला मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते म्हणाल्या की, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ७० ते ८० टक्के जास्त आहे. तर आयएमडीचे निवृत्त अधिकारी अनुपम कश्यपी म्हणाले, यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. मात्र मे महिन्यात येणारा दुसरा अंदाज अधिक महत्त्वपूर्ण राहणार आहे. 1988 पासून हवामान खाते मान्सूनचा अंदाज वर्तवते. या ३७ वर्षात १९८८ पासून ते २०२४ पर्यंत हवामान खात्याचा अंदाज सुमारे ५०-५० % खरा ठरला. शास्त्रज्ञ आपल्या अंदाजात प्लस- मायनस ५ टक्क्यांची मुभा ठेवत असतात. १९ वेळा ही भविष्यवाणी खरी तर १८ वेळा खोटी सिद्ध झाली. पण 2021, 2022, 2023 व 2024 या चार वर्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्यासाठी तीन कारणे महत्त्वपूर्ण आहेत. पहिला- जगभरातील हवामान मॉडेल सांगताहेत की यंदा मान्सून संपेपर्यंत एल निनोची शक्यता नाही. ला-निनाची म्हणजे सामान्य परिस्थिती असेल. दूसरे- हिंद महासागरातील दोन्ही टोकांतील तापमान फरकापेक्षा आयओडी (इंडियन ओशिन डायपोल) सामान्य राहील. ते पॉझिटिव्ह झाल्यावर सरासरीहून जास्त तर निगेटिव्ह झाल्यावर सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो. तिसरे- उत्तरी गोलार्धात नॉर्थ पोल, युरेशिया व हिमालयावर बर्फाच्छादन डिसेंबर २०२४ व मार्च २०२५ पर्यंत सरासरीपेक्षा कमी होते. ही परिस्थिती मान्सूनसाठी अनुकूल असते. बर्फाच्छादन वाढल्यावर कमी पाऊस पडतो. तर कमी झाल्यावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो. यंदा कमी असल्यामुळे चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. सुमारे ३० वर्षे दुष्काळ व नंतरची ३० वर्षे चांगला पाऊस, असा साधारण मान्सूनचा ट्रेंड असतो. १९७१ पासून दुष्काळी परिस्थितीचे संकट निर्माण झाले होते, पण ही परिस्थिती आता निवळली आहे. २००१ पासून देशभरात मान्सूनचा पॉझिटिव्ह ट्रेंड सुरू आहे, तो यंदाही कायम राहू शकतो.