महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल:संजय राऊत यांचा मोठा दावा; 600 कोटींच्या भूखंडावरुन बावनकुळेंवर टीका
आमच्यातील सर्व गाळ गेलेला आहे. मात्र जे राहिले आहेत ते राहणारच असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांनी पक्षाशी बेइमानी केली ते गेलेले आहेत. त्यामुळे आता आमचे कोणीही जाणार नाही. अनेक संकटे पचवून ते आमच्यासोबत राहिलेले आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर आहेत. मात्र, शिंदे यांचा विचार वेगळा असू शकतो. त्यांनी ‘पैसा फेको, तमाशा देखो’ ही नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणली आहे. मात्र ती विचारधारा बाळासाहेबांची नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला आम्ही उखडून फेकून देऊ. त्याला थोडा वेळ लागू शकतो. मात्र, आम्ही त्यांना उखडल्याशिवाय राहणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची लाचारी करणे म्हणजे इतिहासकाळात मुजरा करण्यासारखे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यांना कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला. आम्ही तुमच्या सारखी लाचारी स्वीकारली नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच मिळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तो एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील असेल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे ईडी आणि सीबीआय यांच्या भीतीने पळाले आहेत. अशा लाचारीला शिवसेनाप्रमुख हे वेश्याचे राजकारण म्हणायचे. अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे कधी पुस्तकच काय तर साधे वर्तमानपत्र देखील वाचत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बावनकुळेंनी 600 कोटी रुपयांचा भूखंड एक रुपयाला घेतला 600 कोटी रुपयांचा भूखंड यांनी एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्रातला लुटले हे तेच बावनकुळे आहेत का? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. असा बालिशपणा आम्ही कधीही करणार नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माणसाला ताबडतोब अटक करायला हवी. ईडी आणि सीबीआय कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तीला महसूल मंत्री केले हाच मोठा गुन्हा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 600 कोटी रुपयांचा भूखंड एक रुपयाला घेतला, तसा तो आम्हाला मिळेल का? असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. ते बावनकुळे नाही तर रावणकुळे आहेत, असे देखील ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन टीका भाजपाच्या जाहीरनाम्यात तीन लाख रुपया पर्यंत कर्ज माफ करण्याचे वचन देण्यात आलेले आहे. आता काय करणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नसाल तर तुमचा जाहीरनामा खोटा होता, असे जनतेला सांगा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत पंधराशे, दोन हजार, पाच हजार रुपये देऊन मतदान विकत घेण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. आता ते पैसे वसूल करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आता दरवाढ होणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. हा केवळ मुंबईकरांसाठीचा मेळावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला कोणीही अनुपस्थितीत नव्हते. जे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते त्यांचे आप-आपल्या मतदारसंघात कार्यक्रम होते. हे आम्हाला माहिती होते. केवळ मुंबईकरांसाठी हा मेळावा होता. या कार्यक्रमाला केवळ मुंबईतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. या कार्यक्रमाची कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी चिंता करणे सोडावे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून कालच्या मेळाव्या उपस्थित नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नावर देखील राऊत यांनी स्पष्टिकरण दिले आहे.