मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करा:भाजप आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी, महाविकास आघाडीने केली होती सुरुवात
महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली उर्दू शिक्षण केंद्रे बंद करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात केली आहे. भायखळा येथील उर्दू शिक्षण केंद्राचा मुद्दा यावेळी मिहिर कोटेचा यांनी उपस्थित केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भूखंडाचे उर्दू शिक्षण केंद्रात रूपांतर करत महाविकास आघाडीने तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात बोलताना आमदार मिहिर कोटेचा म्हणाले, मागच्या विधानसभेच्या अधिवेशनात मला या विषयावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या भागात बीएमसी संचालित 7 शाळा आहेत, जिथे उर्दू शिकवली जाते. या शाळांमधील उपस्थिती केवळ 10 ते 20 टक्के इतकी आहे. उर्दू शिक्षण केंद्राऐवजी तिथे कौशल्य विकास संस्था उभारल्यास तरुणांना रोजगार मिळेल, असे कोटेचा यावेळी म्हणाले. पुढे मिहिर कोटेचा म्हणाले, उर्दू शिक्षण केंद्रातील उपस्थिती पाहता मी हे उर्दू शिक्षण केंद्र योजना रद्द करण्याची मागणी करतो. कारण ती महाविकास आघाडीद्वारे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी होती आणि तिथे आयटीआय बंधावे, अशी आग्रहाची मागणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात कामकाजादरम्यान आमदार, सदस्य राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत सभागृहात आवाज उठवताना दिसत आहेत. यावेळी मिहिर कोटेचा यांनी उर्दू शिक्षण केंद्राचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच उर्दू केंद्रांच्या स्थापनेमागे केवळ राजकीय लांगूलचालन हाच हेतू असल्याचा आरोप त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.