महावितरणच्या दामिनी पथकाचे थकबाकीदारांवर लक्ष्य:अमरावती जिल्ह्यात 36 कोटींची वसुली करण्यासाठी महिला अभियंत्यांचे पथक सज्ज

महावितरणच्या दामिनी पथकाचे थकबाकीदारांवर लक्ष्य:अमरावती जिल्ह्यात 36 कोटींची वसुली करण्यासाठी महिला अभियंत्यांचे पथक सज्ज

अमरावती जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणचे दामिनी पथक कंबर कसून सज्ज झाले आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पाच दिवसांत ३६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दामिनी पथकात १० महिला अभियंते आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीला सुरक्षा रक्षक आणि तंत्रज्ञ देण्यात आले आहेत. मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील चारही विभागांत हे पथक कार्यरत आहे. अमरावती शहर विभागातून १७ कोटी, अमरावती ग्रामीण विभागातून ६ कोटी, मोर्शी विभागातून ३ कोटी आणि अचलपूर विभागातून १० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची आहे. दहा हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ग्राहक आणि वसुलीस टाळाटाळ करणारे ग्राहक दामिनी पथकाच्या रडारवर आहेत. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज मीटर जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. कारवाईदरम्यान अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश पथकाला देण्यात आले आहेत. वीज चोरी आढळल्यास विद्युत कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. बिलांसंबंधी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापक विजय पचारे आणि व्यवस्थापक विकास बांबल यांच्या नेतृत्वाखाली लेखा विभाग तत्पर आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांना त्वरित बिल भरून कटू कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment