राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नेत्यांवर मोठी कारवाई:प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत पक्षातून केले निलंबित
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 8 नेत्यांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. सुनील तटकरे यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीच्या काही नेत्यांनी बंडखोरी केल्याचे पहायला मिळाले. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले. तर काही ठिकाणी बंडखोर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अशात महायुतीच्या घटकपक्षांकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून याअगोदर बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील मोठी कारवाई केली आहे. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाच्या 8 नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार या बंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशा माहिती सुनील तटकरे यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे परिपत्रक जारी करत देण्यात आली आहे. या 8 जणांचे पक्षातून निलंबन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पुजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा श्रीमती ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निलंबित केले आहे. या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात नामांकन पत्र भरून पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक करून पक्षशिस्तभंग केला असल्यामुळे सदर पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निलंबित करण्यात येत असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.