मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालू:कायदेशीर कारवाईला सामोरे जाणार, राजेंद्र घनवट यांनी दमानियांचे आरोप फेटाळले

मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालू:कायदेशीर कारवाईला सामोरे जाणार, राजेंद्र घनवट यांनी दमानियांचे आरोप फेटाळले

राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांचा छळ करत कमी दराने त्यांच्या जमीनी खरेदी केल्या. हा घनवट धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच राजेंद्र घनवट कोण आहेत तर जसे कराड धनंजय मुंडेंच्या जवळ होते तसेच घनवट हे देखील मुंडेंच्या जवळचे आहेत, असाही दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यावर आता राजेंद्र घनवट यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मला बदनाम करण्याचा कट असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राजेंद्र घनवट म्हणाले, मी पहिले तर समाजसेविका अंजली ताई दमानिया यांचे धन्यवाद मानतो. त्या समाजासाठी चांगले काम करत आहेत. ही समाजासाठी हिताची बाब आहे. आता माझ्याबद्दल बोलायचे झाले तर माझा आणि अंजली ताई आम्ही कधी भेटलो नाही. या ज्या सोनावणे ताई आहेत, त्या जे म्हणत आहेत की ही जागा माझी आहे, ती जागा 1967 पासून तिच्या आजोबांनी विकलेली आहे. 1997 साली या जमिनीचा जो मालक होता तो वारला. त्यानंतर त्या मालकाच्या वारसाने ही जागा 2005-06 ला ही जागा स्वतःच्या नावावर केली आणि ती जागा भगवान गायकवाड यांनी विकत घेतली आणि विकत घेऊन सदर जागा ही मला त्यांनी सांगितले की अशी जागा मी तुमच्या हद्दीत घेतली आहे. ही जागा तुम्हाला पाहिजे का? त्यावर मी म्हटले ठीक आहे आणि कायदेशीर पद्धतीने ती जागा खरेदी केली, अशी माहिती राजेंद्र घनवट यांनी दिली. मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न पुढे बोलताना राजेंद्र घनवट म्हणाले, सदर महिला आणि जेवढे तिथे ते आजूबाजूला उपस्थित होते त्यांच्या कोणाशीही माझा संबंध आजपर्यंत डायरेक्ट आलेला नाही. परंतु मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याबाबतीत मी माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर जी कारवाई आहे त्या कारवाईला मी सामोरे जाईल, असे राजेंद्र घनवट म्हणाले. हे राजकारण करताना काही शासनाचे विरोधक जे सेशन देवेंद्र फडणवीस चालवतात त्यात काहीतरी उकरीत काढायचे आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि आपला हेतु सध्या करण्यासाठी काही लोक पोलिस अधिकारी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी मला त्रास दिलेला आहे आणि या महिलेला जे चालवत आहेत ते शशिकांत भरत चव्हाण यांच्यावर 818/2020 गुन्हा चाकण पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. तसेच 307 मध्ये देखील शशिकांत टावर लोकेशन सीडीआरमध्ये आलेले आहेत. त्यामुळे जे कोणी अंजली ताई दमानिया यांच्याकडे जाते त्यांची माहिती दमानिया यांनी घेतली पाहिजे, असेही घनवट म्हणाले. अंजली दमानिया यांचा आरोप काय आहे? राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांचा छळ करत कमी दराने त्यांच्या जमीनी खरेदी केल्या. हा घनवट धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच राजेंद्र घनवट कोण आहेत तर जसे कराड धनंजय मुंडेंच्या जवळ होते तसेच घनवट हे देखील मुंडेंच्या जवळचे आहेत. व्यकंटेश्वरा कंपनीचे दोन डायरेक्टर आहेत, ते म्हणजे राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट आहेत. यासह जगमित्र शुगरमध्येही राजेंद्र घनवट हे डायरेक्टर आहेत, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. राजेंद्र घनवट यांनी 11 शेतकऱ्यांचा छळ करत शेती खरेदी केली. यामध्ये एका शेतकऱ्याची 20 कोटींची जमीन 8 लाख रुपयांमध्ये खरेदी केली गेली तर दुसरीकडे एका शेतकऱ्यांची 1 कोटीची शेती 4 लाख रुपयांमध्ये खरेदी केली गेली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment