‘मलाच अशी मुले का?’ म्हणत दोन मुलांसह विहिरीत उडी:एका मुलाचा मृतदेह सापडला; सोलापूर तालुक्यातील वांगी येथील घटना

दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह अाईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास वांगी (ता. उत्तर सोलापूर) गावातील शेतात घडला. त्यापैकी सहा तास शोधानंतर दोघांचे मृतदेह सापडले. एका मुलाचा शोध सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणले. चित्रा कविराज ऊर्फ दत्तात्रय हाके (२८) आणि स्वराज कविराज हाके (२) यांचा मृतदेह सापडला. पृथ्वीराज कविराज हाके (५) याचा शोध सुरू आहे. एक मुलगा गतिमंद व दुसऱ्यास ऐकू कमी येत असल्याच्या तणावातून चित्रा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. चित्रा या पतीसह शेती करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी. मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतिमंद होता. त्याच्या उपचारावर मोठा खर्च झाला. दुसरा मुलगा स्वराज यास ऐकू कमी येत होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. यामुळे चित्रा या मानसिक तणावात होत्या. मलाच अशी मुले का? असे त्या वारंवार म्हणत, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. चित्रा यांनी दोन मुलासह शेतातील ५० ते ६० फूट विहिरीत उडी घेतल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज याचा मृतदेह तरंगत असल्याने तो काढण्यात आला. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. चित्रा यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी सहा वाजता बाहेर काढला.