मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक प्रताप:गरीब रुग्णांसाठी असलेला 35 कोटी 48 लाखांचा निधी वापरलाच नाही, धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी असलेला 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयाच्या संदर्भात चौकशी आणि तपास करण्यासाठी धर्मदाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेला अहवालात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहे. त्यामुळे रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये गरीब रुग्णांच्या उपचारासाठी असलेला 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरला गेला नसल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रत्येक धर्मदाय रुग्णालयाने त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के निधी हा निराधार आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या उपचारासाठी राखून ठेवावा, असा नियम आहे. मात्र, मंगेशकर रुग्णालयाकडे जमा असलेल्या या निधीतील 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरला गेला नसल्याची माहिती कागदपत्रांमुळे समोर आली आहे. 2025 मार्च पर्यंत रुग्णालयाने वापरलेल्या निधीची ही रक्कम तशीच असल्याची धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे. पुणे मनपाची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस दीनानाथ रुग्णालयाशी संबंधित तनिषा भिसे गरोदर माता मृत्यू प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे महापालिकेने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास मनाई केली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर प्रथम उपचार करा त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. महापालिकेने आपल्या नोटीसीत सर्वच खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्यास बंदी घातली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाऊ नये. सर्वप्रथम रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मनपाने आपल्या तातडीच्या नोटीसीद्वारे दिलेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इमर्जन्सी स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.