मनमोहन सिंगांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा भारताचा सुवर्ण काळ:जागतिक मंदीच्या काळातील त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची- पृथ्वीराज चव्हाण
डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात मनरेगा, माहिती अधिकार, खाद्यान्न सुरक्षा, भूमी अधिग्रहण, शिक्षण हक्क, यासारखे कायदे झाले. त्यामुळे तो दहा वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असं माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. जागतिक मंदीच्या काळात महत्त्वाची भूमिका जागतिक मंदीच्या काळामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांनी देशाला आर्थिक मंदीची झळ बसू दिली नव्हती. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते, परंतु ते राजकारणी नव्हते, अशा भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत. अर्थतज्ज्ञ असल्याचा नव्हता गर्व पृथ्वीराज चव्हाणांनी पुढे म्हटलंय की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे काम केलं होतं. त्या काळात मी त्यांचा अत्यंत निकटवर्तीय होतो. ते उच्चशिक्षित आणि अर्थतज्ज्ञ होते. त्याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. पंतप्रधान असूनही प्रचंड नम्रता डॉ. मनमोहन सिंग यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होतं. राजकारणात असूनही ते राजकारणी नव्हते, असे त्यांना म्हटले जायचे. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधानांसारखे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती, हे मी अगदी जवळून पाहिले असल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. विद्वान, अतिशय कुशल प्रशासक गेला- श्रीनिवास पाटील माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आर्थिक उदारीकरणाचे श्रेय हे डॉ.मनमोहन सिंग यांना जाते, अशी प्रतिक्रिया माजी राज्यपाल तथा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. डॉ. मनमोहन सिंग हे 1991 ते 1996 या काळात केंद्रीय अर्थमंत्री होते. भारताची आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या कारकिर्दीत कराडचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. ते एक विद्वान, अतिशय कुशल प्रशासक होतेच, पण एक सहृदयी व्यक्ती देखील होते. त्यांच्या निधनामुळे अर्थशास्त्र, राजकिय व सामाजिक क्षेत्रातील एक तत्त्वज्ञ काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे श्रीनिवास पाटील यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.