मनोज जरांगेंची धनंजय देशमुखांनी घेतली भेट:उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने इथे यावे, सरकारला केली विनंती
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. शनिवार 25 जानेवारी पासून त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे. आंतरवाली सराटी येथे त्यांनी हे उपोषण सुरू केले असून हे त्यांचे सातवे उपोषण आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना आता मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भेट दिली आहे. तसेच ते देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, मनोज जरांगेंची प्रकृती खूप खालावत आहे. त्यांना बळ द्यावा. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मी विनंती करतो. सरकारने गांभीर्यपूर्वक याची दखल घेतली पाहिजे. उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने त्या मान्य कराव्यात, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही खुनशी किंवा जातीयवादी नाही. आम्ही कुणावरही डुख धरत नाही. इथे कुणीही येऊ शकतो आणि कुणीही जाऊ शकतो. इथे सगळा देश येऊन गेला आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे पंकजा मुंडे लवकरच जरांगेंची भेट घेतील असा दावा केला जात आहे. पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच जरांगेंची भेट घेण्याचीही तयारी दर्शवली होती. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी मला संपूर्ण सन्मान आहे. त्यांच्या उपोषणावर मी असंख्यवेळा भाष्य केले आहे. त्यांच्या लढ्याला घटनात्मक चौकटीत न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे. त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी त्यांच्याशी चर्चा करेन. जरांगेंनी याविषयी सकारात्मकता दाखवावी. मी त्यांना तसा निरोप पाठवणार असून, त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करणार आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.