भुजबळांचे मंत्रिपद हुकले, तो आमचा प्रश्न नाही:सामूहिक उपोषणाची उद्या पत्रकार परिषद घेऊन तारीख सांगणार – मनोज जरांगे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावरून मनोज जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतले नाही?, हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचे आम्हाला काही देणे-घेणे नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. तसेच उद्या पत्रकार परिषद घेऊन पुढील उपोषणाची तारीख असल्याचेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा रविवार विस्तार झाला. 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. याबाबत भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला घेतले काय आणि फेकले काय? मंत्रिपद आले गेले पण भुजबळ संपला नाही, अशा शब्दांत छगन भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीवर मनोज जरांगे यांनी जास्त बोलणे टाळले. काय म्हणाले मनोज जरांगे?
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतले नाही?, हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचे आम्हाला काही देणे घेणे नाही. फक्त एवढीय प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, असे आवाहन सरकारला केले. देवेंद्र फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही जरांगे यांनी केली. उद्या सांगणार उपोषणाची तारीख मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला, आता उद्या पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाची तारीख सांगणार, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचे, त्यांनाच उपोषणाला बसवले जाईल, उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातले जाणार नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसले, तरी मी एकटाच बसणार असल्याचा निर्धार जरांगे यांनी केला. मी जर उपोषणाला बसा म्हटले तर घराघरांमधून मराठे उपोषणाला बसतील, अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. अनेकदा भुजबळ-जरांगे समोरा-समोर
मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी विविध मोर्चे आणि उपोषणे देखील केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची त्यांची विशेष मागणी आहे. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते ओबीसीमधून नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
मनोज जरांगेंनी दिला होता सामूहिक उपोषणाचा इशारा
मनोज जरांगे यांनी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर 8 दिवसांनी आंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत सत्ता कुणाचीही आली तरी आरक्षणासाठी मला लढा द्यावाच लागेल. नवे मंत्री झालेल्यांना 8 दिवस आनंद घेऊ देणार. त्यानंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले होते. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन होऊन 10 दिवस लोटून गेले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे सामूहिक उपोषणला बसणार की, हिवाळी अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे ही वाचा… ‘होय मी नाराज’; छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया:राज्यसभेची ऑफर धुडकावली; मनधरणीचे प्रयत्न, पक्षात महत्त्वाचे पद मिळणार ‘होय मी नाराज आहे’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘होय मी नाराज आहे, पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे’ असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा…