मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा:शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार; भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे सायंकाळी होणार आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे यांची सभा सुरू होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीचा मनसेचा मेळावा हा कायमच चर्चेत असतो. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या सभेत महत्त्वाचे भाष्य करण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम णाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीचा वाद, महायुती सरकारचा कारभार यावरही काय भाष्य करणार याकडे लक्ष आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर मोठे व्यासपीठ उभारण्यात आले असून मैदानात चार मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. पाण्याचे टँकर्स, पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाइल टॉयलेट, रुग्णवाहिका, फायर इंजिन असणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शुश्रूषा, हिंदुजा हॉस्पिटल येथे आपत्कालीन खाटा आरक्षित करून ठेवल्या आहेत. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. टिझरमध्ये हिंदुत्व, पक्षाची पुढची भूमिका मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टिझर दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता. या टिझरमध्ये हिंदुत्व, पक्षाची पुढची भूमिका, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल, मनसेची पुढची भूमिका हे सगळे विषय आहेत. त्यामुळे या विषयांवर राज ठाकरे बोलणार यात शंकाच नाही. तसेच महापुरुषांचा अवमान प्रकरण, मराठी आणि इतर भाषिक वाद याबाबतही राज ठाकरे भाष्य करु शकतात. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. सोबतच पक्षांतर्गत कार्यकारणी मध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील.