बाजारात 600 बैलांची आवक, तर 428 विक्री:गावठी बैलांना शेतकऱ्यांची मागणी, बेल्हे येथील बाजारात बैलांची आवक वाढली

बाजारात 600 बैलांची आवक, तर 428 विक्री:गावठी बैलांना शेतकऱ्यांची मागणी, बेल्हे येथील बाजारात बैलांची आवक वाढली

आळेफाटा राज्यात प्रसिद्ध असलेल्या बेल्हे येथील आठवडे बाजारात सोमवारी बैलांची आवक चांगली वाढली; मात्र बैलांचे भाव स्थिरच होते. या बाजाराबरोबरच शेळी-मेंढी, तरकारी, कडधान्य बाजारही येथे भरतो. संगमनेर, नाशिक, लासलगाव, कल्याण, नांदेड, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांतून व तालुक्यातून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी-विक्रीसाठी येथे येतात. येथे गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येतात. सोमवारी बाजारात बैलांची आवक बऱ्यापैकी होती, मात्र बैलांचे भाव स्थिरच होते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात बैलांना थोडाफार भाव असल्याने बैलांची आवक वाढली आहे. बाजारात ६०० बैलांची आवक झाली, तर ४२८ विक्री झाली. म्हशी व रेडे २०६ आवक, तर विक्री १५९ झाली. गावठी बैलांना जास्त मागणी होती. ७० हजार रुपयांना या बाजारात खिल्लार बैलजोडी मिळत असल्याचे व्यापारी व शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारात खिल्लारी बैलजोडीचे भाव ६० ते ७० हजार रुपये, तर गावठी बैलजोडीचे भाव ४० ते ५० हजार रुपये होते. कालच्या बैल बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. शेळ्या मेंढ्यांची आवक २५१, तर विक्री १२६ झाली. खरेदी-विक्रीचे व्यवहार ओळखीवर, उसनवारीवर व इसार देऊन होतात. बैल बाजारातून महागडे बैल खरेदी करण्यापेक्षा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत शेतकरी करून घेतात. असे असले तरी आजही बैलांचे व्यवहार बऱ्यापैकी होत असल्याची माहिती बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख शैलेश नायकवाडी यांनी दिली. सध्या शेतकरी यांत्रिकीकरणावरच जास्त भर दिलेला असल्याचे व्यापारी संतोष पिंगट यांनी सांगितले. सध्या जनावरे सांभाळणे शेतकरी वर्गासाठी अवघड झाले असून, एका दिवसाचा बैलजोडीचा जनावराचा खर्च ७०० रुपयांच्या आसपास येतो. त्यामध्ये ओला चारा, सुका चारा व पशुखाद्य असा आहे. त्यातही महागाई मोठ्या वाढल्याचे जामखेडचे व्यापारी अविनाश मुळे यांनी सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment