मातोश्री तुमचे ऐकणार नाही:एक दिवस अंबादास दानवेंचे जोडे उचलावे लागतील, संजय शिरसाटांचा चंद्रकांत खैरेंना इशारा

छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी शिवसेना ठाकरे गटाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीला माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते. तसेच अंबादास दानवे यांनी आपल्याला बोलावलेच नाही, असा आरोप खैरे यांनी केला होता. तसेच अंबादास दानवे काड्या करत आहे, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आज मातोश्री गाठले. चंद्रकांत खैरे मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. मातोश्रीवर तुमचे ऐकले जाणार नाही, अडीच वर्षापुर्वी आम्हीही त्यांना काही सांगायला गेलो होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, पण त्यांनी ऐकले नाही, शेवटी पक्ष फुटला. चंद्रकांत खैरे यांची पक्षात जी अवस्था झाली आहे, त्याने उद्धव ठाकरे यांना काही फरक पडणार नाही. ते तुमचे ऐकणार नाही, आमच्याकडे या, एकनाथ शिंदे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. आज निर्णय घेतला नाही तर तुम्हाला एक दिवस अंबादास दानवे यांचे जोडे उचलावे लागतील, असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला आहे. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेतील खैरे-दानवे हा वाद न संपणारा आहे. खैरेंनी आमच्याकडे यावे, त्यांचा योग्य मान राखला जाईल. ते ज्येष्ठ आणि निष्ठावंत आहेत, लवकर व्यक्त होतात. हे हेरुनच अंबादास दानवे त्यांना डिवचण्याचा प्रयत्न वारंवार करतात. खैरेंना फोन न करणे, कार्यक्रमाची माहिती न देणे, न बोलवणे हा मुद्दाम केला जाणारा प्रकार आहे. ज्यामुळे खैरे चिडतात आणि जाहीरपणे व्यक्त होतात. यातून त्यांची बदनामी मातोश्रीवर केली जाते. दरम्यान, सोमवारी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टीका केली होती. चंद्रकांत खैरे म्हणाले होते, मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचे होते. मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नव्हते, मला विचारायला हवे होते. मला डावलून कसे चालेल? आज उद्धवजी संकटात आहे. त्यामुळे एकत्र येऊन काम करावे लागेल. मात्र कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही. मी मरेल पण पक्ष सोडणार नाही. असे असताना अंबादास दानवेने मला सांगितले नाही, याबाबत मी उद्धव साहेबांना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. तो आता दोन चार महिनेच असणार आहे. शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतोय.