मी शरद पवारांना आज ही दैवत मानतो:अजित पवारांचे पिंपरीमध्ये विधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? पुन्हा रंगली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरी, कोणत्या ना कोणत्या कारणाने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात. दोन्ही गटातील नेत्यांचा एकमेकांशी संवाद होत असतो. दोन्ही गटांकडून शरद पवार आपले आदर्श असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी चर्चाही अनेकवेळा रंगलेली पाहायला मिळते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवारांबाबत असेच काहीसे विधान केले आहे. मी शरद पवार यांना काल ही दैवत मानत होतो, आज ही दैवत मानतो, असे अजित पवार म्हणालेत. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा पिंपरी सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांबाबत बोलताना मोठे विधान केले. आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले. दरम्यान, अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांचे कौतुकही केले. अण्णा बनसोडे हे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून अण्णा बनसोडे यांना विधासभा उपाध्यक्ष केले. पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास आहे. या प्रवासात बनसोडेंनी बरेच चढ उतार पाहिले. अण्णा बनसोडे यांना अपयश आले, तेव्हा, गौतम चाबुकस्वार आमदार झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही, ते पुन्हा आमदार झाले, असे अजित पवार म्हणाले. भान ठेऊन वागा आणि बोला, अण्णा बनसोडेंना सल्ला विधानसभेत काम करत असताना आता भान ठेऊन वागा आणि बोला, असा सल्ला अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना दिला. आता तुमच्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. तुमचे वागणे, बोलणे याकडे सगळेच लक्ष ठेवणार. तुमच्या चिरंजीवांनाही काही गोष्टी सांगा. आपण मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या घरातीलच नातेवाईक काहीतरी वागला तर आपलीच बदनामी होते. त्यामुळे भान ठेऊन काम करा, असे अजित पवार अण्णा बनसोडे यांना म्हणाले. अमेरिकेने वाढवलेले टेरीफ कोरोनानंतरचे नवीन संकट डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश अमेरिकेत निर्यात करत आहेत. त्यांना याचा फटका बसत आहे कोरोनानंतर हे एक नवे संकट आलेले आहे. त्याचा आपल्याला सामना करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशात चांगले संबंध जोडलेले आहेतच, याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. बीडमध्येही शरद पवारांबाबत केले होते विधान दरम्यान, यापूर्वीही अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना एका भाषणामध्ये शरद पवारांबाबत विधान केले होते. त्यावेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतिचिन्ह न आणण्याची विनंती केली होती. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले असल्याचे ते यासंबंधी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती.