मीच तुझा हरवलेला मुलगा म्हणत घरात एंट्री:नाव बदलून आधार कार्ड बनवले, प्रॉपर्टीवरही ठोकला दावा; शंका आल्याने अखेर भांडाफोड
दोन वर्षांपूर्वी एक साधू घरातील वृद्ध महिलेसमोर आला आणि मीच तुझा हरवलेला मुलगा असे म्हणत घरातील इतर मंडळींचा विश्वास संपादित करत घरात राहायला लागला. या काळात त्याने रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच सर्व प्रॉपर्टीवर नाव लाऊन घेतले. नंतर महिलेचे निधन झाले आणि हा साधू देखील निघून गेला. वर्षश्राद्धाच्या वेळी परत आला तेव्हा घरातील नातेवाईकांना संशय आला आणि त्याचे बिंग फुटले. सातारा येथील या घटनेने सर्वांचेच भुवया उंचावल्या आहेत. अगदी चित्रपटाला देखील लाजवेल असे ही घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षांपूर्वी हरवेलेला तुझा मुलगा मीच असे म्हणत एका भोंदू साधूने घरात प्रवेश केला आणि तब्बल दोन वर्षे तो या घरात राहिला. अचानक महिलेसमोर मीच तुझा मुलगा असे सांगत महिलेला घट्ट मिठी मारत याने सर्वांना विश्वासात घेतले. महिलेसह त्यांच्या बहिणींना देखील हा मुलगा असल्याचे खरे वाटले होते. दरम्यान, महिलेचे निधन झाल्यानंतर सर्व विधी देखील यानेच पूर्ण केल्या आणि निघून गेला. वर्षश्राद्ध करण्याची वेळ आली तेव्हा तो पुन्हा आला. यावेळी मात्र काहींना त्याच्यावर शंका आली आणि त्यांनी थेट पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सोमनाथ कुचेकर नावाने मुलगा असल्याचे सांगत राहत असलेल्या या भोंदूबाबाचे बिंग सर्वांसमोर आले. हा मूळचा जळगाव येथील जामनेर येथील असल्याचे समोर आले. तसेच याचे खरे नाव एकनाथ रघुनाथ शिंदे असे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. नाव बदलून या भोंदू बाबाने घरात एंट्री मारली तसेच महिलेची सर्व प्रॉपर्टी देखील त्याने त्याच्या नावावर करून घेतली होती. या सोमनाथ कुचेकर नावाने त्याने आधार कार्ड देखील तयार केले तसेच रेशन कार्ड सुद्धा याने बनवून घेतले होते. याचे बिंग बाहेर आल्यानंतर पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे पुन्हा कुटुंबीयांकडे सुपूर्द केले असून आरोपी बाबावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.