मेट्रो स्थानकावर आंदोलन, दीड तास सेवा बंद:पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या नरेंद्र पावटेकर यांची शरद पवार गटातून हकालपट्टी

वाढती बेरोजगारी, शासकीय रुग्णालयातील भ्रष्टाचार, मोफत शिक्षण मागणी, राजकारणातील घराणेशाही बंद करणे,शिक्षणातील व्यावहारिक बाजार थांबवणे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शरद चंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मनपा मेट्रो स्थानकावर मेट्रो लाईन वर बसून आंदोलन केल्याचा प्रकार घडला. यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केल्याने पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे. जगताप म्हणाले, नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही.अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या आहे. निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत.आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत आपल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जागेवर आणल्याशिवाय आपण उठणार नाही असा पवित्रा घेत, दीड तास मेट्रो सेवा ठप्प ठेवली. मेट्रो पुलावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने अग्निशामक दलाच्या पथकाने यावेळी पुलाखाली जाळी धरत बचाव कार्यासाठी तयारी देखील केली. पोलिसांची या प्रकारामुळे धावपळ उडाली तसेच त्यांनी वारंवार विनंती करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक यांनी पोलिस आणि माध्यमे यांच्यावर हात उचलण्याचा प्रकार घडला.अखेर पोलिसांनी सदर ठिकाणी शिरून आंदोलकांची धरपकड करत सदर आंदोलन मोडीत काढले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सर्व आंदोलक यांना नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.