मंत्री नीतेश राणे यांना कोर्टाचा मोठा दिलासा:अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याच्या प्रकरणात सुटका; अधिकारी, साक्षीदारांचे डोळ्यांवर हात

मंत्री नीतेश राणे यांना कोर्टाचा मोठा दिलासा:अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याच्या प्रकरणात सुटका; अधिकारी, साक्षीदारांचे डोळ्यांवर हात

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना 2017 मधील एका चर्चित प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तत्कालीन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याच्या आरोपातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, मासे नेमके कुणी फेकले हे त्यांनी पाहिले नाही. त्यामुळे पुराव्याअभावी राणे यांच्यासह इतर आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. कोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. 21 मे रोजी सिंधुदुर्गातील अतिरिक्त सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने बेकायदेशीर जमाव करणे, गुन्हेगारी बळाचा वापर, हल्ला करणे तसेच कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत पोहोचवणे या गंभीर आरोपांतून नितेश राणे आणि इतर 30 जणांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाचा सविस्तर आदेश मागील आठवड्यात सार्वजनिक करण्यात आला. या निकालामुळे नितेश राणेंना कायदेशीरदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला असून, राजकीयदृष्ट्या देखील त्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात केलेल्या आरोपानुसार, 6 जुलै 2017 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता मालवण येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रदीप व्यस्त यांच्या केबिनमध्ये मोठा जमाव घुसला होता. जिल्ह्यातील मच्छीमार समुदायाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान, नितेश राणे यांनी केबिनमध्ये मासे फेकले आणि अधिकाऱ्याला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी त्यांना जामीन मंजूर झाला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिलेल्या साक्षीत स्पष्ट केले की, 6 जुलै 2017 रोजी त्यांच्या केबिनमध्ये विविध मच्छीमार गटांच्या समस्या मांडण्यासाठी मोठा जमाव जमा झाला होता. त्या वेळी आमदार नितेश राणे हे निवेदन वाचत असताना, एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या टेबलावर टोपलीभर बांगडे मासे फेकले. त्यातील एक मासा थेट वस्त यांच्या गालावर लागल्याचे त्यांनी सांगितले. मासे फेकणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे दिसले नव्हते वस्त यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या इतर चार अधिकाऱ्यांनीही अशाच स्वरूपाची साक्ष दिली. त्यांच्यापैकी कोणालाही मासे फेकणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे दिसले नव्हते. तसेच एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते की, नितेश राणे यांनी प्रदीप वस्त यांना त्यांच्या खुर्चीत अडवून ठेवत शिवीगाळ केली होती. मात्र प्रत्यक्ष साक्षीदारांनी त्या क्षणी मोठा गोंधळ असल्याने नेमके काय घडले, हे स्पष्ट ऐकू आले नव्हते, असे सांगितले. नितेश राणे यांच्यासह इतर 30 जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, तपास अधिकाऱ्यांनी आरोपींची ओळख परेड घडवून आणली नव्हती. त्यामुळे साक्षी आणि पुराव्यांमध्ये विसंगती असल्यामुळे नितेश राणे यांच्यासह इतर 30 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सुनावणीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले की, आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावत असताना रोखल्याचा एकही ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. न्यायाधीश देशमुख यांनी हेही सांगितले की, सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांना धमकावल्याचा किंवा त्यांच्यावर हल्ला केल्याचा कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार न्यायालयात हजर नव्हता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षींमध्ये सुसंगतता नसल्यामुळे आणि घटना घडताना नेमके काय झाले हे स्पष्टपणे कोणीही सांगू न शकल्यामुळे, सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही न्यायालयात सिद्ध झाला नाही. यामुळेच न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह सर्व 30 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे नितेश राणे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment