मंत्री असूनही मुस्लिमविरोधात द्वेषाचे वक्तव्य:नितेश राणेंवर कारवाई करण्यात यावी, अबू आझमींची मागणी

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक वातावरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षातर्फे अबू आझमी यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. यासह विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाने आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी अबू आझमी यांनी भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. अबू आझमी म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. परंतु, अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री हे सातत्याने मुस्लिम विरोधी द्वेषाचे वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद निर्माण करीत आहेत. तसेच, दादर व मुंबई मधील इतर विभागात मुस्लिम समाजाच्या फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही मंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासारख्या मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत आहोत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 2023 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दिलेल्या निकालानुसार दोषी व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. धर्मनिरपेक्ष संबंधांची पर्वा न करता द्वेष पसरवणाऱ्या, हिंसाचाराला प्रवृत्त करणाऱ्या, जनतेला धमक्या देणाऱ्या, आर्थिक बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या, धर्म, जात, प्रदेश, भाषा या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सर्व संघटनांवर बंदी घालण्यात यावी. प्रत्येक नागरिकाच्या व्यवसाय, व्यापार, धंदा करण्याच्या मूलभूत अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे राज्याने आपल्या घटनात्मक कर्तव्यानुसार संरक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धा आणि विश्वासाच्या स्वातंत्र्याचे राज्याने संरक्षण करावे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेदानुसार राज्यात शांतता आणि न्यायाचे वातावरण असावे. शांतता, कायदा आणि संविधानाच्या शत्रूंना कायद्याच्या कचाट्यात आणून आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर आणि कठोर शिक्षा देऊन कायद्याचे राज्य आणि न्याय अत्यंत पारदर्शकपणे प्रस्थापित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.