मंत्री पदावरील व्यक्तीवर न्यायालय ताशेरे ओढते हे धक्कादायक:मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत?, आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जपानच्या टोकियो येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे स्वागत आम्ही वरळी मुंबईमध्ये करू शकलो याचे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या केसवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालय ताशेरे ओढले जातात हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पुढे ते म्हणाले, राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी बंद करण्यात येत असून लाडकी बहीण योजनेवरही निर्बंध घातले जात आहेत. त्याच अनुषंगाने, या योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा जे साथी त्यांच्यासोबत आहेत, जे भ्रष्टाचार करत आहेत त्यांना ब्रेक लावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लक्ष्य केले. वांद्रे कोर्टात धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यावर झालेल्या सुनावणीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे धक्कादायक आहे, मंत्री पदावर असेल त्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालयाकडून ताशेरे ओढले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कोणत्याही गोष्टी जात कशा नाहीत? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. मुंबईत रस्ता घोटाळा आदित्य ठाकरे मुंबईमधील घोटाळ्यावर बोलताना म्हणाले, मुंबईत रस्ता घोटाळा झाला आहे, हे मी आधीपासून सांगत आहे. पण, आयुक्तांनी तो एक्सपोज केला. एकनाथ शिंदे यांचा खोटरडेपणा त्यांनी समोर आणला. माझे चॅलेंज आहे, 26 टक्के रस्ते पूर्ण झाले आहेत, हे तुम्ही दाखवा. केवळ 5 टक्क्यांपेक्षा जास्त कुठेही रस्ते झाले नाहीत, असा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आनंदाचा शिधामध्येही भ्रष्टाचार आदित्य ठाकरे म्हणाले, शिवभोजन आणि आनंदाचा शिधा यासंदर्भात 1 लाख कोटींचे बिले अजून थकलेली आहेत. कंत्राटदारांनी एक दिवसाचा बंद पाळला पाहिजे. आर्थिक आणि राजकीय शिस्त सरकारने स्वतःला लावणे गरजेचे आहे. कॉन्ट्रॅक्टर्ससाठीची उधळपट्टी बंद करा. शिवभोजन थाळी आम्ही सुरू केली होती, कोरोनामध्ये मोफत जेवण मिळायचे. आनंदाचा शिधामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, बाकीचे काम करणाऱ्यांची बिले थकवायची आणि लाडक्या कॉन्ट्रॅक्टरची उधळपट्टी करायची, असे सरकारचे काम असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

  

Share