हस्ताक्षरावरून सांगत आहेत कोणते करिअर निवडावे:तोच कोर्स करतात, ग्राफोलॉजिस्ट सांगत आहेत मुलांचे भविष्य

असे म्हणतात की, हस्ताक्षरावरून एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावता येतो. कोलकात्यात हे प्रत्यक्षात घडत आहे. येथे मुलांच्या हस्ताक्षराच्या विश्लेषणातून त्यांचे भविष्य ठरवले जात आहे. पालक आपल्या मुलांच्या हस्ताक्षराचे विश्लेषण करून त्यांच्यासाठी योग्य करिअर पर्याय शोधत आहेत. त्यानुसार त्यांना कोर्समध्ये प्रवेश दिला जात आहे. कोलकाताच्या ग्राफोलॉजी संस्थेचे संचालक मोहन बोस सांगतात की, २०१६ साली पहिल्यांदा पालक आपल्या मुलांच्या हस्ताक्षराच्या विश्लेषणासाठी आले होते. आता दर महिन्याला २-३ जोडपी येथे येतात. हस्ताक्षर विश्लेषणानंतर मुलांची ॲप्टिट्यूड टेस्ट करून त्यांची व्यक्तिमत्व व आवड शोधली जाते. कोरोनानंतर यात वेग आला आहे. आतापर्यंत २०० हून अधिक मुलांच्या हस्ताक्षराच्या आधारावर त्यांच्या करिअर आणि कोर्सबद्दल माहिती दिली आहे. हे सायकोमेट्री टेस्टपेक्षा अधिक प्रभावी आहे. सायकोमेट्री टेस्टमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर त्यांना अनेक करिअर पर्याय दिले जातात, परंतु येथे आम्ही फक्त एक पर्याय देतो. २०१९ मध्ये एक वडील आपल्या १९ वर्षांच्या मुलाच्या हस्ताक्षराचे विश्लेषण करण्यासाठी आले होते. आज त्यांचा मुलगा पीएचडी करत आहे. युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मी मेडिकलची तयारी करत होतो. अपयशी ठरलो. माझ्या हस्ताक्षराच्या विश्लेषणानंतर मायक्रो बायोलॉजी निवडण्यास सांगितले गेले. नंतर न्यूरोबायोलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडण्यास सांगितले गेले. आज मी फेलोशिपसह परदेशात त्या क्षेत्रात पीएचडी करत आहे. २००२ मध्ये कोलकातात्यात स्थापन ही संस्था पुण्यानंतर देशातील दुसरी सर्वात जुनी ग्राफोलॉजी संस्था आहे. येथे आतापर्यंत २० हजारांवर लोकांनी ग्राफोलॉजीचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण पूर्वी फक्त ऑफलाइन होते, आता ऑनलाइनही होते. ग्राफोथेरेपीद्वारे आजारांची ओळख करून त्यावर उपचारही शक्य ग्राफोलॉजीद्वारे एंग्जायटी, डिप्रेशन, मूड डिसऑर्डर, मेनिया, पॅनिक डिसऑर्डर, बायपोलर न्यूरोसिस, ओसीडी यांसारख्या मानसिक आजारांची ओळख होऊ शकते. राइटिंगद्वारे उपचारही शक्य आहेत, ज्याला ग्राफोथेरेपी म्हणतात. यात रुग्णाच्या हस्ताक्षरात बदल करण्याचा प्रयत्न केला जातो. हस्ताक्षर बदलल्याने मेंदूला सिग्नल जातो. वारंवार केल्याने मेंदू नवीन गोष्टी स्वीकारून जुन्या गोष्टी (समस्या, भीती, दबाव) मिटवतो. शब्दांमध्ये स्पेस आणि अनावश्यक वळणे असल्यास पकडले जाण्याची भीती… मोहन बोस सांगतात, हस्ताक्षरातून व्यक्तीच्या मनस्थितीचा अंदाज घेता येतो. ते म्हणतात की, हस्ताक्षर पाहून व्यक्ती दबावाखाली आहे, रागात आहे किंवा इतर कोणत्या समस्येत आहे हे ओळखता येते. यावर आधारित काउंसिलिंगही करता येते. ते लोकांना लिहून भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित करतात. काही वर्षांपूर्वी धनबादच्या एका शाळेच्या प्राचार्यांनी मला शाळेत पोर्न सीडी आणणाऱ्या विद्यार्थ्याला शोधण्याची विनंती केली होती. सर्व विद्यार्थ्यांना ‘मी ही सीडी आणली नाही’ असे एक वाक्य लिहायला सांगितले. त्यातूनच त्या विद्यार्थ्याला पकडले. त्याच्या लिखाणात पेनचा खूप दबाव होता. शब्दांमध्ये स्पेस आणि अनावश्यक वळण होते. पकडले जाण्याची भीती असते, तेव्हा असे घडते.