मोहम्मद अली जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय:तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मोहम्मद अली जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेनंतर सभागृहात गोंधळ उडाला होता. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का? राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना संजय राऊत म्हणाले, तुम्ही खुश दिसत आहात. पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला तेव्हा सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत. तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मला वाटायचे आम्ही हिंदूराष्ट्र बनवणार आहोत, पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरू आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतात, आता मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली. अयोध्येत जमीन घोटाळा झाला संजय राऊत यांनी पुढे बोलताना अयोध्येतील जमीन घोटाळ्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. हिंदूंच्या जमिनीची रक्षा करता येत नसेल, तर मुसलमानांची काय करणार? तुमच्या सरकारला जमीन विक्रीच करायची आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, काश्मीर पंडितांना अद्याप जमीन आणि घरे मिळालेली नाहीत, त्यांची तुम्हाला काहीही चिंता नाही. पण जमिनीचा वापर करण्यासाठी तुम्ही विशेष धोरण राबवत आहात. जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू त्यांनी घेतली – उद्धव ठाकरे दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या विधेयकावर टीका केली आहे. सुधारणा विधेयकमध्ये काही मुद्दे चांगले आहेत. वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असं म्हणताय, म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषण अमित शाह यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी केली. जे तुम्ही म्हणताय आम्ही हिंदुत्व सोडलं, ते गद्दार मुस्लिमांची स्तुती करत होते. तेव्हा तुम्ही शांत का बसले? कुठे गेले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.