मोहीम:200 गावांमध्ये मुले बनली शिक्षक; 2 वर्षांत 30 हजार प्रौढ झाले साक्षर; माता-पिता यांना साक्षर करण्याचे लक्ष्य

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील सुमारे २०० गावांमध्ये आता पाढे आणि बाराखडीचे आवाज ऐकू येतात. या गावांमध्ये शालेय विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत तर मोठी माणसे विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसतात. खरे तर या गावांतील मुले निरक्षरतेचा कलंक दूर करण्यासाठी दोन वर्षांपासून मोहीम राबवत आहेत. ते त्यांच्या पालकांना, अशिक्षित प्रौढांना, शेजारी राहणाऱ्या वृद्धांना शिकवतात. बाळूमठ, सेमर, कल्याणपूर, चिरू यांसारख्या अनेक गावांमध्ये ६०० ठिकाणी प्रौढांसाठी वर्ग भरतात. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक प्रौढ येथे शिक्षण घेऊन साक्षर झाले. त्यापैकी २० हजार महिला आणि सुमारे १० हजार पुरुष आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने (एनआयओएस) त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्रही दिले. २०२२ साली मुलांनी शिक्षकांच्या प्रेरणेने ही मोहीम सुरू केली. देशातील साक्षरता दर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षीपासून मुलांना ‘न्यू इंडिया लिटरसी’ या उपक्रमात सहभागी करून घेत ही मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत चेतना केंद्रे उघडण्यात येणार आहेत. त्यात १८ हजार निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये मुले वृद्धांसाठी वर्ग घेतील.
१२० तासांत हाेऊ शकतात साक्षर शिक्षणतज्ज्ञांच्या मते निरक्षर लोक १२० तासांत साक्षर होऊ शकतात. म्हणजे दोन तासांचा वर्ग असेल तर निरक्षरतेचा कलंक ६० दिवसांत पुसला जाऊ शकतो. तुरीसोट येथील लक्ष्मीदेवी म्हणतात- एके दिवशी माझा मुलगा शाळेतून घरी आला. त्याने अचानक विचारले, तू अभ्यास करशील का? मी हो म्हणाले. यानंतर जेव्हा जेव्हा तो शाळेतून परत यायचा तेव्हा तो मला शिकवू लागला. माझ्यामुळे आजूबाजूच्या १३-१४ महिलाही अभ्यास करत. हळूहळू आम्ही अक्षरे समजायला, नंतर लिहायला शिकलो. आता पुस्तकेही वाचताे.
शिस्त… वर्गात न येण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल
शाळेतून परतल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुले वडिलधाऱ्यांसाठी वर्गात जातात. येथे त्यांना दीड ते दोन तास शिकवतात. येथे ज्येष्ठांची उपस्थितीदेखील अनिवार्य आहे. ते आले नाहीत तर कारण द्यावे लागते. बाळूमठचे सुरेंद्र साव म्हणतात- मुले ज्येष्ठांना मुळाक्षरे आणि मोजणी शिकवतात. त्यामुळे आता या ज्येष्ठांना बँकेत अंगठा उमटवण्याची ठेवण्याची गरज नाही. विचार… पालकांना अशिक्षित म्हणू नये म्हणून दिले शिक्षण अशिक्षित असल्यामुळे लातेहारच्या ग्रामीण भागातील अनेक लोक फसवणुकीला बळी पडले. सरकारी योजना किंवा बँकांमध्ये ते अंगठा उमटवत. काही मुलांनी ही समस्या शिक्षकांना सांगितली. यानंतर चांदवा येथील सरकारी हायस्कूल तुरिसोटचे प्राचार्य विजयकुमार यांनी बाल संसदेच्या माध्यमातून २८ जानेवारी २०२२ रोजी विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षित करण्यासाठी प्रेरित केले. लातेहारचे 3 नवसाक्षर दिल्लीस जाणार… लातेहारचे डीएसई गौतमकुमार साहू म्हणाले की, जिल्ह्यातील ३ नवसाक्षरांना दिल्लीला पाठवणार. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त कार्यक्रमात तिघेही अनुभव सांगतील.
शाळेत शिकणाऱ्या मुलांनी २ वर्षांत २० हजार महिला आणि १० हजार निरक्षर पुरुषांना साक्षर केले. आता ते बँकेत अंगठा उमटवत नाहीत, स्वाक्षरी करतात.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment