अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा:उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल, कंपनीतील पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय
अमरावतीमध्ये 100 हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदगाव पेठ एमआयडीसीतील एका कंपनीत ही धक्कादायक घटना घडली. गोल्डन फायबर एलएलपी कंपनीत काम करणाऱ्या महिलांना विषबाधा झालेली आहे. या महिलांना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील पाण्यामुळे किंवा नाश्त्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय काही महिलांनी व्यक्त केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही महिलांची गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका महिलेने सांगितल्यानुसार, 700 महिलांना मळमळ, उलटी आणि पोटदुखीचा त्रास होत आहे. मनसेमुळे प्रकार आला उघडकीस नांदगाव एमआडीसीतील कापड उद्योगाची गोल्डन फायबर एलएलपी कंपनीत आल्यानंतर सकाळी नऊ वाजेपासून महिलांना त्रास सुरू झाला. परंतु, त्यावेळी कंपनीने कोणालाही बाहेर येऊ दिले नाही. उलट डॉक्टरांना कंपनीत बोलावले. काही लोकांना सुटी दिली. कंपनीने या घटनेत बेजाजबदपणे काम केले. महिलांना त्रास सुरू झाल्यानंतर थेट घरी जाण्यास सांगितले. कुणालाही आतमध्ये येऊ देत नव्हते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी सर्वांशी बोलल्यानंतर या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात आणल्याचे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. जवळपास 700 महिलांना त्रास
पाणी पिल्यानंतर मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर उलटी झाली असून पोटदुखीचा त्रास होत असल्याचे एका महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले. जवळपास 700 महिलांना त्रास होत असल्याचे या महिलेने सांगितले. कंपनीत आल्यानंतर पाणी पिल्यापासून हा त्रास होत असल्याचेही त्यांनी म्हटले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या अडगावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर आज एमआडीसीतील कंपनीत काम करणाऱ्या महिलांना विषबाधा झाली आहे. यामुळे आता कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.