मुंबईत सुरू होणार बिबट्या सफारी:संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सुरू होणार प्रकल्प, पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश

मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. बिबट्याची सफारी सुरू करण्यासंदर्भात त्यांनी वन विभागाला सूचना केल्या असून प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच या उद्यानात दोन सिंह वर्षभरासाठी दत्तक घेण्यात आले आहेत. आशिष शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जिथे बिबट्याचे बछडे आढळून येतात त्यांना याच उद्यानात संरक्षित ठेवण्यात आले आहे. मात्र, पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 30 हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तसेच प्रकल्प उभारणीसाठी जवळपास 5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी सादर केलेल्या रीपोर्टनुसार, या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्रात उत्पन्न वाढेल, अशी माहिती देत मंत्री आशिष शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले. सादरीकरण झाल्यानंतर आशिष शेलार यांनी या क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी सुरू करण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे आश्वासन दिले आहे. तसेच याचे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे देखील निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, या उद्यानात भारत आणि भारती असे दोन 3 वर्षांचे सिंह 26 जानेवारी रोजी गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी आशिष शेलार यांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा पालनपोषणासाठी होणारा खर्च शेलार वैयक्तिक रित्या करणार आहेत.

  

Share