मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार:उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई महापालिका, शाखा प्रमुखांना दिल्या सूचना

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग दिला आहे. काहीजण मुंबई लुटायला आले आहेत. पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे. आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मिशन मुंबई महानगरपालिका सुरू केल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीणसाठी महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण मुंबई लुटायला आले आहेत. पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे. आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा. तुम्हाला अजून देखील अनेक आमिष येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा. ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण होणार मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी व श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वार्थाने महत्त्वाची आहे. यानुसार आता 7 तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण होणार आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमला जाणार असून हा निरीक्षक शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घेणार आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमण्यात येणार आहे. हे निरीक्षक मुंबईत प्रत्येक शाखेत जाऊन आढावा घेतील. त्याच सोबतच निरीक्षक शाखा बांधणीचा आढावा देखील घेणार आहेत. शाखेचे पदाधिकारी आहेत की नाहीत, कोणती आणि किती पदे रिक्त आहेत, याचा अहवाल हे निरीक्षक शिवसेना भवन येथे सादर करणार आहेत.

  

Share