संगीतकार इलय्याराजांना मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले:स्वाभिमानाशी तडजोड नाही- इल्लयाराजा

विख्यात संगीतकार तथा राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य सी. इलय्याराजा यांना श्रीविल्लिपुथूर मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्यामुळे वादाचे मोहोळ उठले आहे. इल्लयाराजांच्या चाहत्यांनी हा जातिभेद असल्याचा आरोप केला आहे, तर ही अफवा ‌असल्याचे इलय्याराजा यांनी म्हटले अाहे. इलय्याराजा रविवारी पेरिया पेरूमल मंदिर, नंदवनम आणि अंडाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना गर्भगृहात जाण्यासाठी परवानगी नाकारली असे सांगण्यात येते. त्यासंबंधित एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात मंदिराच्या अर्थमंडपाच्या पायऱ्यांवरून गेलेले इलय्याराजा काही लोकांशी बोलून माघारी परतताना दिसतात. दरवाजाबाहेर उभे राहूनच त्यांनी दर्शन घेतले. तामिळनाडूचे हिंदू धार्मिक तथा धर्मार्थ संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी इलय्याराजा आले होते. ते श्री दंडी श्रीमन्नारायण रामानुज चिन्ना जीयर (वैष्णव धर्मगुरू) यांच्याशी बोलून गर्भगृहासमोरील अर्थमंडपममध्ये प्रवेश करणार होते. त्या वेळी अर्थमंडपममध्ये केवळ त्या मंदिराचे पुरोहित आणि जीयर हेच प्रवेश करू शकतात, असे इलय्याराजा यांना सांगण्यात आले. दरम्यान, इलय्याराजा यांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहिली असून त्यात ते म्हणतात, काही लोक माझ्यासंदर्भात अफवा पसरवत आहेत. मी कधीही आणि कोणत्याही ठिकाणी स्वाभिमानाशी तडजोड करणारा माणूस नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment