मोठी बातमी:संभाजीनगर मधील दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा वाळूज परिसरात एन्काउंटर; वडगाव कोल्हाटीत रात्री चकमक

छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर याचा पोलिसांच्या एनकाऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री ही चकमक झाली. यामुळे आता या प्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यानंतर पोलिस दरोडेखोरांच्या मागावर होते. यातील मुख्य आरोपी अमोल खोतकरला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून देखील अधिक माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीनगर मधील बजाज नगर परिसरात राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. यात सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अद्यापही फार होता. त्यालाच ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळत कारवाई सुरू केली होती. यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर हा काल रात्री पोलिसांना सापडला. मात्र त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या दिशेने गोळी चालवली. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबार त्याचा मृत्यू झाला. असा टाकला दरोडा दिवसभराचे काम आटोपून अंगावरील शर्ट काढून बनियनवर केअर टेकर संजय झळके रोजच्यासारखे बुधवारी (१४ मे) झोपी गेले. सकाळी उठू अन् तेच रोजचे काम करू या नियोजनात असलेले उद्योजक संतोष लड्डा यांचे केअर टेकर बंगल्यात एकटेच झोपलेले होते. तासांमागून तास निघून गेले अन् मध्यरात्रीची वेळ म्हणजे १ वाजून ५८ मिनिटांनी अचानक झळके यांच्या छातीवर दरोडेखोरांनी बंदूक ताणली. अगदी अर्ध्या तासापूर्वीच झोपी गेलेले संजय झळके यांना अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही सुचेनासे झाले. त्यांना काही कळण्याआधीच दरोडेखोरांनी त्यांचे हात पाठीमागे नेत ते एका लाल रंगाच्या कपड्याने बांधले. एवढेच नव्हे तर आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडावर दरोडेखोरांनी चिकट टेप चिकटवला. सहापैकी दोघांनी त्यांच्यावर बंदूक तशीच रोखून धरलेली होती, तर उर्वरित आरोपींनी दरोडा टाकण्यास सुरुवात केली अन् खेळ सुरू झाला. सकाळ झाल्यानंतरही संजय झळके तसेच बनियनवर पोलिसांसोबत फिरत होते. दोन तास सुरू होता दरोड्याचा थरार उद्योजक संतोष लड्डा हे औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरात गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेदरम्यान सहा दरोडेखोर स्विफ्ट डिझायर कारने दाखल झाले. अगदी पाच मिनिटांत ते घरात शिरले. आधी कंपाउंड वॉल ओलांडत नंतर शिडीने छत गाठले अन् मग बेडरूममध्ये शिरले. १ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झालेला हा दरोड्याचा थरार तब्बल दोन तास सुरू होता. या दोन तासांत चोरट्यांनी ५ किलो ५०० ग्रॅम सोने आणि ३२ किलो चांदी लंपास केली.दरोडेखोरांचा संवाद हिंदीतून, एकमेकांना सलमान, गुड्डू म्हणून मारत होते हाका: संजय झळके यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर एकमेकांशी हिंदीतून संवाद साधत होते. एकमेकांना सलमान, गुड्डू म्हणून हाका मारत होते. या घटनेनंतर केअर टेकर संजय झळके हे सकाळी ४.३० वाजता कसेबसे बंगल्याबाहेर आले. त्यांनी शेजारी घराचा पायाने दरवाजा वाजवत त्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली. ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता १५ मे रोजी पहाटे २ ते ४ यादरम्यान ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर बंगल्यातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी असा सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. एवढ्या मोठ्या दरोड्याची राज्यभर चर्चा होती. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे वर्ग केला होता. ११ दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २ अशी ९ पथके तपास करीत होती.