नागपूरमधील हिंसाचारामागे बाहेरचे नाही तर ओळखीचेच चेहरे:राऊत यांचा आरोप; भडकवण्यासाठी हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा

नागपूरमधील हिंसाचारामागे बाहेरचे नाही तर ओळखीचेच चेहरे:राऊत यांचा आरोप; भडकवण्यासाठी हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा

नागपूरमधील हिंसाचारामागे बाहेरच्या व्यक्ती असल्याचा आरोप केला जात असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. नागपूर मध्ये दिसत असलेले चेहरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या ओळखीचेच असल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूर मध्ये हिंसाचार करणारे नागपूर मधीलच होते. हिंदूंवर मुद्दाम हल्ले करून हिंदूंना भडकवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. हिंदूला भडकवण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात, हा एक नवीन पॅटर्न तयार केला गेला आहे. नागपूर किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारे काम करण्याची कोणाची हिंमत आहे? हा एक दंगलीचा नवीन पॅटर्न निर्माण झाला आहे. आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचे, त्यांच्यावरती हल्ले करायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचे. त्यानंतर राज्यात आणि देशात दंगली पेटवायच्या आणि त्यानंतर 2029 च्या निवडणुकीला सामोरे जायचे हा नवीन पॅटर्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हल्ले करणारे कोण आहेत? त्यांना कोणाची प्रेरणा आहे? राज्यात दंगली का घडवत आहात? हा महाराष्ट्रातील संशोधनाचा विषय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. होळीला देखील यांनी वातावरण खराब केले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. गुढीपाडव्याला देखील आपलेच लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील, असा आरोप त्यांनी केला. राज्यात हिंदू – मुसलमान दंगली पेटवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यासाठी बाबरी मशीदचे उदाहरण दिले जात असल्याचेही ते म्हणाले. बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर उध्वस्त करू, असे ते म्हणत आहेत. मात्र सरकार तुमचे आहे, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, मग दंगली कशाला करता? सरकारने जाऊन कबर उध्वस्त करून टाकावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ – पावडे घेऊन जावे आणि कबर उद्धस्त करावी, असेही ते म्हणाले. त्यांच्या लोकांची इच्छा त्यांनी पूर्ण करावी, अशा शब्दात त्यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे ते प्रतीक असल्याचा आम्ही वारंवार सांगत असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भाजपची विचारधारा, पाहता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करायचे आहे. त्यांची ही सुरुवातीपासूनचीच विचारधारा आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे भाजपचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतीक नव्हते आणि नाही. त्यामुळे आधी व्हिलन संपवला की, हिरो आपोआप संपतो. त्यामुळे व्हिलन वरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवण्याचा षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या जनतेने या षडयंत्र पासून सावध राहायला हवे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment