नागपूरच्या पॉश भागात गोळीबार:हॉटेल मालकाची गोळ्या झाडून केली हत्या, धरमपेठ परिसरात खळबळ
नागपूरमध्ये गोळीबाराची घटना घडली असून शहरातील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ भागातील हॉटेल मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी (28) यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले असून पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान, या घटनेने धरमपेठ भाग हादरले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळपेठ बाजार परिसरात असलेल्या शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी (28) यांची मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अविनाश भुसारी हे त्यांचे मित्रांसोबत बसले होते, यावेळी दोन दुचाकीवरून चार अज्ञात व्यक्ती आले आणि अविनाश यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना दाखल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. अविनाश भुसारी यांची हत्या जुन्या वादातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री 1 च्या सुमारास आरोपी आले व अविनाशवर सहा राऊंड फायर केले व त्यानंतर पसार झाले. तसेच या आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी नागपूरच्याच मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. 4 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान दुचाकी वर आलेल्या चार हल्लेखोरांनी अचानक येऊन शिवीगाळ सुरू केली, आणि एका तरुणाबद्दल चौकशी करत गोळीबार केला. त्यात सोहेल खान नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.