नक्षल्यांचा भारत बंद, डोंडरा जंगलात घातपात:नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक शहीद, 2 पोलिस जखमी

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाशराव गिरिपुंजे (४६) हे शहीद झाले. साेमवारी ९ जून रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या हल्ल्यात एक पोलिस उपायुक्त, एक ठाणेदार व पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. गिरिपुंजे हे सुकमा जिल्ह्याच्या कोंटा विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यां-विरोधात सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या आक्रमक कारवाईदरम्यान २१ मे रोजी नक्षल्यांचा सर्वोच्च नेता व भारतीत कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) महासचिव नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू याचा सुरक्षा जवानांनी चकमकीत खात्मा केला होता. या चकमकीत एकूण २७ नक्षलवादी ठार झाले होते. दरम्यान, बसवा राजूच्या स्मरणार्थ व सरकारच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती ऊर्फ अभय याने १० जूनला भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण रेड झोनमध्ये पोलिस व केंद्र व राज्य सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी शोध अभियान सुरू आहे. सुकमा जिल्ह्यात साेमवारी सकाळी नक्षलवादविरोधी अभियान राबवण्यात येत होते. या मोहिमेत कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गिरिपुंजे हे स्वत: जवानांसोबत पायी गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंडरा गावाजवळ एका दगडाच्या खाणीजवळ नक्षलवाद्यांनी आधीच सापळा रचून ठेवलेला होता. तत्पूर्वी त्यांनी खाणीजवळचे एक पोकलेन जाळले. ही माहिती आकाश यांना मिळताच त्यांनी आपला मोर्चा घटनास्थळाकडे वळवला आणि तिथेच घात झाला.