नर्हे परिसरात रूममेटवर प्राणघातक हल्ला:शिवीगाळीच्या वादातून वॉचमनने हाऊसकिपिंग कर्मचाऱ्याच्या गळ्यावर केला चाकूने वार

नर्हे परिसरात शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात त्याचावर धारदार चाकूने गळा चिरून खुनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश पवार (रा. झोलो पिनाकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात अर्जुन राय रियांग हा गंभीर जखमी झाला. सचिन मधुकर खांबल (40, रा. झोलो पिनाकल, वाल्हेकर चौक, नर्हे) यांनी फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर 2024 पासून फिर्यादी सचिन खांबल हे महेश पवार आणि अर्जुन राय रियांग यांच्यासोबत राहतात. अर्जुन आणि फिर्यादी हॉस्टेलमध्ये हाऊसकिपिंगचे काम करतात. तर महेश पवार हा त्याच ठिकाणी वॉचमेनचे काम करतो. महेश आणि अर्जुन यांचे वारंवार वाद होतात. अर्जुन हा महेशला आई बहिणीवरून शिवीगाळ करत असल्याने महेशचा अर्जुनवर राग होता. महेश हा अर्जुनला तू बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहेस, तू आम्हाला जगायला शिकवतोस का ? अशा बोलण्यावरूनही त्याच्यात वाद होत होते.रात्री सचिन हा रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर अर्जुन खाली पडला. महेशला बाजूला ढकलून देत सचिनने बाजूच्या मित्रांना ओरडून बोलवले. तोपर्यंत महेश तेथून पळून गेला. सचिन यांनी तात्काळ अॅम्बुलन्सला बोलवून अर्जुनला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहे.