नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार?:सुधाकर बडगुजर नाराज, म्हणाले- पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतले नाही

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. तसेच सोमवारी 2 जून रोजी बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना देखील बडगुजार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सुधाकर बडगुजर यांच्यासह पक्षातील 10 ते 12 जण नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. याविषयी सुधाकर बडगुजर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, शहरातील जी प्रश्न असतात ती स्थानिक लेव्हलला जर सुटले नाही तर आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचते करावे लागतात आणि ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे काल. नाशिक कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे, त्यात 2700 कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेत 3609 जागा रिक्त आहेत आणि 4100 कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी 2000 सफाई कर्मचारी आहेत व इतर सहवर्गातील 2100 कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनीई दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी नियोजन व्हावे, नाशिक महापालिकेवर तसेच कर्मचाऱ्यांवर तणाव येऊ नये या भावनेने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. सुधाकर बडगुजर हे नाराज असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना ते म्हणाले, केवळ मीच नाराज नाही तर 10 ते 12 जण नाराज आहेत. पक्षातील संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत. ते वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर घातलेले आहे. परंतु त्यात सुधारणा करावी अशी अनेकवेळा मागणी पण झाली, परंतु अद्याप काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नाराजी आहे आणि ती नाराजी दूर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. संघटनात्मक बदल करताना विश्वासात घेतले नाही संजय राऊत यांच्याविषयी बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले, राऊत साहेब हे कुटुंबातीलच आहेत, ते आदरणीय नेते आहेत. त्यांच्यासोबत मी अनेक वर्ष काम केले आहे. ते निर्भीडपणे बोलतात. त्यांच्याबद्दल नाराजीचा विषय नाही. विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या त्या घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे विलास शिंदे हा अनेक दिवसांपासून नाराज आहे. महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती की वरिष्ठ पद मिळावे पण ते नाही मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून ते नाराज आहेत. परंतु आम्ही सातत्याने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुधाकर बडगुजर म्हणाले, विलास शिंदेसोबत मी काम केलेले आहे. मी जिल्हाप्रमुख असताना ते महानगर प्रमुख होते आणि समाजाबद्दल त्यांचे आणि माझे सूत्र जुळले होते त्यामुळे आम्ही एकत्रित संघटनेसाठी काम केले. आम्ही त्यावेळेस खासदार निवडून आणला होता. विरोधक त्यावेळी यांच्यावर खूप जोरात सुटले होते, असे असताना आम्ही एकत्रित काम केले आणि खासदार निवडून आणला. त्यामुळे विलास शिंदे यांना अपेक्षा होती की मोठे पद मिळेल, पण नाही मिळाले. मी स्वतःवरच नाराज आहे आपली नाराजी कोणावर आहे संजय राऊत की पक्षप्रमुख, असा प्रश्न विचारला असता यावर सुधाकर बडगुजर म्हणाले की मी कोणावर नाराज नाही, मी स्वतःवरच नाराज आहे. तसेच नाराजी स्पष्ट असताना काही निर्णय घेतले जाऊ शकतात का? असे विचारले असता त्यावर ते म्हणाले की, अजून तरी स्पष्ट भूमिका कोणी घेतली नाही, परंतु याविषयी येणारा काळच ठरवेल, अशी माहिती दिली आहे.